मनीषा म्हात्रे
मुंबई : 'हॅलो, कुलाबा पोलिस स्टेशनमधून बोलतोय' म्हणत पोलिस गणवेशात एकाने मुंबईतील ८१ वर्षीय आजीला व्हिडीओ कॉल केला. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून तिला जाळ्यात ओढून ७.८ कोटींच्या जमापुंजीवर डल्ला मारला. 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिनाभर ही आजी प्रत्येक गोष्ट ठगांच्या परवानगीनेच करत होती. धक्कादायक बाब म्हणजे 'आयबी'च्या माहितीने त्यांना या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी दारात पोहोचलेल्या मुंबई पोलिसांनाही खोटे पोलिस समजून आजीने घराबाहेर काढले. अखेर, पोलिसांनी पहिल्यांदाच स्वतः तक्रार देत खात्यातील व्यवहार थांबविले.
आझाद मैदान पोलिसांच्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या आजी एका ऑइल कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या. पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या दोन्ही मुली परदेशात असतात. १० जुलै रोजी आजीला सायबर भामट्याने व्हिडीओ कॉल करून आजीकडे चौकशी सुरू झाली. बँक खात्याच्या तपासणीच्या नावाखाली त्यांच्या म्युच्युअल फंड, एफडी, शेअर विकून ती रक्कम पाठवण्यास सांगितली. बँकेत कुणी विचारल्यास दुबईत मालमत्ता खरेदी करायचे असल्याचे कारणही सांगण्यास सांगितले. त्यानुसार, १० ते २३ जुलैदरम्यान त्यांनी सर्व जमापूंजी विकून ठगांना ७.८ कोटी दिले. महिलेच्या खात्यातील व्यवहार संशयास्पद वाटल्याने आयबीने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती दिली.
घराबाहेर दीड तास ड्रामा
सुरुवातीला आजीने पोलिसांना घरात घेण्यास नकार दिला. दीड ते दोन तास सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी जागामालकाच्या मदतीने आजीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर भामट्यावर विश्वास ठेवून खऱ्या पोलिसांना घराबाहेर काढले. त्याच दिवशी त्यांनी ५९ लाखांचे व्यवहारही केले होते. पुढे त्या घर विकून त्यावरही कर्ज घेतील या भीतीने पोलिसांनी पहिल्यांदाच स्वतःहून १९३० या हेल्पलाइनवर तक्रार देत ते बँक खाते गोठविण्यास सांगितले.
कंबोडिया कनेक्शन
पोलिसांनी त्यांच्या मुलीशी संपर्क साधला. अखेर, मुलीने आईला सर्व गोष्टी पटवून देताच त्या तक्रारीसाठी पुढे आल्या. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. कंबोडियातील सायबर भामट्यांचे यामागे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.