देशात गॅस सिलिंडर पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या अफवांचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता आपला मोर्चा ज्येष्ठ नागरिकांकडे वळवला आहे. ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये एका ६१ वर्षीय वृद्ध महिलेला गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवून तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका बनावट लिंकच्या आधारे या ठकांनी ११ वेळा व्यवहार करून महिलेचे बँक खाते रिकामे केले.
नेमकी घटना काय?
ग्रेटर नोएडा वेस्ट येथील एका सोसायटीत राहणाऱ्या गुजीब कालरा यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण 'आयजीएल' गॅस कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवले. "तुमचे गॅस बिल थकीत आहे, जर आत्ताच्या आत्ता पैसे भरले नाहीत, तर तुमचे कनेक्शन कायमचे कापले जाईल," अशी धमकी त्याने दिली. गॅस कनेक्शन कापले जाईल या भीतीने कालरा घाबरल्या आणि त्यांनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला.
एका 'लिंक'ने घातला घात
या ठकाने महिलेला मोबाईलवर एक लिंक पाठवली आणि त्याद्वारे बिल भरण्यास सांगितले. महिलेने लिंकवर क्लिक करताच तिथे बँक खात्याची गोपनीय माहिती भरण्याचा पर्याय आला. घाईघाईत त्यांनी सर्व माहिती भरली. ही माहिती मिळताच सायबर चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत ११ वेळा व्यवहार करून एकूण २१ लाख रुपये लंपास केले. मोबाईलवर लागोपाठ पैसे कट झाल्याचे मेसेज येऊ लागल्यानंतर कालरा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पोलिसांत धाव आणि तपास सुरू
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने तातडीने सायबर क्राईम पोर्टल आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. सायबर सेलचे प्रभारी विजय राणा यांनी सांगितले की, याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनो ही काळजी घ्या!
- गॅस किंवा वीज बिल भरण्यासाठी कंपनी कधीही वैयक्तिक लिंक पाठवत नाही.
- बिल भरण्यासाठी नेहमी अधिकृत ॲप किंवा वेबसाईटचाच वापर करा.
- फोनवर कोणालाही आपल्या बँक खात्याचा तपशील किंवा ओटीपी देऊ नका.
- धमकी देणाऱ्या फोन कॉल्सना बळी पडू नका, आधी अधिकृत कार्यालयात खात्री करा.
Web Summary : Cybercriminals posing as gas company employees defrauded a senior citizen of ₹21 lakhs by threatening to cut off her gas connection. She clicked a fake link, revealing bank details, leading to multiple fraudulent transactions. Police are investigating; citizens are advised to verify bills and avoid sharing sensitive information.
Web Summary : साइबर अपराधियों ने गैस कनेक्शन काटने की धमकी देकर एक बुजुर्ग महिला से ₹21 लाख ठग लिए। महिला ने एक फर्जी लिंक पर क्लिक किया और बैंक विवरण साझा किए, जिससे कई धोखाधड़ी वाले लेनदेन हुए। पुलिस जांच कर रही है; नागरिकों को बिलों की जांच करने और संवेदनशील जानकारी साझा करने से बचने की सलाह दी जाती है।