ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ घुटखा खाण्यासाठी वडिलांनी १० रुपये दिले नाही, म्हणून एका ४० वर्षांच्या तरूणाने आपल्या ७० वर्षांच्या वृद्ध वडिलांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने धारदार शस्त्राने त्याच्या वडिलांचे डोके धडावेगळे केले आणि ते कापलेले डोके अथवा शीर हातात घेऊन तो सरळ पोलीस ठाण्यात आला आणि त्याने आत्मसमर्पण केले. बैधार सिंह असे आरोपी मुलाच्या मृत वडिलांचे नाव होते.
नेमकं काय घडलं? पोलिसांनीच सांगितलं -बारीपाडा एसडीपीओ प्रवीण मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हत्येचे कारण अत्यंत क्षुल्लक होते. आरोपीने त्याच्या वडिलांकडे गुटखा विकत घेण्यासाठी १० रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि त्याने या रागाच्या भरातच आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली. घटनेवेळी आरोपीची आई देखील तेथेच होती. मात्र, पतीची हत्या होताना पाहून त्या भयभीत झाल्या आणि तेथून पळून गेल्या.
फॉरेन्सिक टीमसह पोलीस तपास सुरू -यानंतर, पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वजण स्तब्ध झाले आहेत. केवळ दहा रुपयांसाठी मुलगा आपल्या वडिलांना एवढ्या कृरपणे कसे मारू शकतो, ही एकच चर्चा लोकांमध्ये सुरू असल्याचे दिसत आहे.