Bangladesh Players turned criminals : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद नावाच्या व्यक्तीला अटक केली. शेहजाद हा बांगलादेशी कुस्तीपटू असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यांनी तेथे जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळली होती. पण नंतर तो भारतात आला. त्याला अपेक्षित काम न मिळाल्याने त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला असे सांगण्यात येत आहे. पण तो एकमेव बांगलादेशी खेळाडू नाही, ज्याच्या नावावर गुन्ह्याची नोंद झालीय. बांगलादेशात असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
शहादत हुसेन- बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शहादत हुसेन आणि त्याच्या पत्नीवर २०१५ मध्ये त्यांच्या अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याचा आरोप होता. शहादत हुसेन याने मोलकरणीला बळजबरीने घरात डांबून ठेवले आणि तिच्याकडून काम करून घेतल्याचे सांगण्यात आले. तिने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर शहादत अनेक दिवस फरार होता. मात्र, नंतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याच वेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले होते.
अराफात सनी- या बांगलादेशी क्रिकेटरला त्याच्या मैत्रिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २०१७ मध्ये त्याच्या घरातून अटक केली. सनी आणि त्याच्या आईवर महिलेकडून हुंडा मागितल्याचा आरोप होता. या आरोपामुळे अराफत सनीला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
कैसर हमीद- २००८ मध्ये फुटबॉलपटू कैसर हमीदवर डॉक्टरच्या हत्येप्रकरणी खटला भरण्यात आला होता. त्याने पिस्तुलाने डॉक्टरला मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर, २०१९ मध्ये त्याला गुंतवणूकदारांच्या निधीच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक देखील करण्यात आली होती.
रुबेल हुसेन- बांगलादेशी अभिनेत्री नाजनीन अख्तरने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. ३ दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर रुबेलला जामीन मिळाला आणि त्याने २०१५चा क्रिकेट वर्ल्ड कप खेळला. त्यात रुबेलची कामगिरी खूप चांगली झाल्याने तिने तिचे आरोप मागे घेतल्याचे सांगण्यात आले.