उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाच नराधमांनी तिच्यावर तब्बल एक वर्ष सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी महिलेला ओलीस ठेवून ही क्रूरता केली.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलासह एक वर्षापूर्वी घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिची ओळख आकाश नावाच्या एका तरुणाशी झाली आणि त्याने तिच्याशी लग्न केले. पण काही दिवसांनी पीडितेला धक्का बसला. आकाशने तिला खोटे नाव आणि बनावट आधार कार्ड दाखवले होते. त्याचे खरे नाव नौशाद होते आणि तो दुसऱ्या समुदायाचा होता.
नवऱ्याची खरी ओळख समोर आल्यावर महिलेने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला धमकावून एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर नौशादने त्याच्या चार मित्रांसह मिळून तिच्यावर वर्षभर सामूहिक बलात्कार केला. रोज तिच्यावर अत्याचार होत होते. या काळात अनेक वेळा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती अयशस्वी ठरली.
आईला फोन करून सांगितली आपबीती
अखेर एका दिवसाची संधी साधून पीडिता आरोपींच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. तिने तात्काळ आपल्या आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. "आई, आकाश नावाच्या तरुणाने माझ्यासोबत लग्न केले. पण तो दुसऱ्या समुदायाचा आहे, त्याचे खरे नाव नौशाद आहे. त्याने मला घरात डांबून ठेवले आणि त्याच्या चार मित्रांसोबत मिळून माझ्यावर रोज बलात्कार केला," असे तिने फोनवर सांगितले.
यानंतर, पीडितेने आपल्या आईसह पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आमच्या मुलीला न्याय हवा!
पीडितेच्या आईने म्हटले की, "एक वर्षापूर्वी आमची मुलगी आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती. आम्ही खूप शोध घेतला, पण ती सापडली नाही. काही दिवसांपूर्वी तिने फोन करून सांगितले की, आकाश नावाच्या तरुणाने खोटे आधार कार्ड वापरून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याने तिला डांबून चार मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला. आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे." हाथरस जिल्ह्यातील मुरसान पोलीस ठाण्यात हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.