ठाणे : मानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई नीलेश पाडवी (२८) याने ठाण्यात बहिणीच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून नीलेशचे वडील पितांबर पाडवी हे ठाणे शहर पोलीस दलातील सेवानिवृत्त राखीव पोलीस निरीक्षक आहेत.नीलेश हा २०१३ मध्ये नंदुरबार ग्रामीण पोलीस दलात भरती झाला. पाडवी कुटुंबात घरगुती कारणातून वाद सुरू असल्याने काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यातच तो कामावर गैरहजर होता. काही दिवसांपूर्वी तो कळव्यातील सीताई छाया टॉवर येथे बहिणीकडे आला होता. शुक्रवारी घरात कोणी नसताना त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबातील सदस्य सायंकाळी घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारच्या पोलीस शिपायाने ठाण्यात केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 05:27 IST