सोलापूर - एकुलता एक मुलगा, आदित्य घरातला शेंडीफळ..मोठा डॉक्टर व्हावा असं आई बाबांचं स्वप्न होतं मात्र मंगळवारचा दिवस आदित्यसाठी काळ म्हणून आला. त्याने सुसाईड करून आयुष्य संपवलं. पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठले. वृद्धापकाळाचा आधार गेल्याची भावाना व्यक्त करताना आई वडिलांना हुंदके आवरता आले नाहीत.
आदित्यच्या स्वभावाबद्दल त्याच्या मित्रांशी संवाद साधला असता ठराविक मित्रांशी मनमोकळेपणाने बोलणारा पण सर्वांची काळजी करणारा असल्याचं सांगण्यात आले. डॉक्टर असलेल्या आदित्यने हे टोकाचं पाऊल का उचलले असावे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सकाळी ८ च्या सुमारास आदित्यने आत्महत्या केली. तो गेल्या काही दिवसांपासून द्वारका पॅरॉडाईजमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत होता. पदवीदान समारंभ झाल्यामुळे तो मंगळवारी रूम खाली करणार होता पण नेमकी ही दुर्दैवी घटना घडली.
वेदना होऊ नयेत म्हणून इंजेक्शनमधून घेतले गुंगीचे औषध
प्राथमिकदृष्ट्या मानसिक तणावातून आदित्यने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. वेदना होऊ नयेत यासाठी आत्महत्येपूर्वी त्याने इंजेक्शनद्वारे गुंगीचे औषध घेतले असावे. त्यानंतर हात कापून घेत तो घरात सर्वत्र फिरला असावा. कारण घरात सर्वत्र रक्ताचे डाग दिसत होते. शिवाय एका कोपऱ्यात मद्याची बाटलीही आढळल्याची सुत्रांनी दिली. आदित्य बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता, त्याच्या अंगावर शर्ट नव्हता. गळ्यावर कापून घेतल्याचे व्रण दिसत होते. त्याच्या उजव्या हाताजवळ रक्तात पडलेला चाकू, डाव्या हाताच्या खांद्याजवळ कात्री दिसत असल्याची माहिती आहे.
कसं उघडकीस आलं?
मंगळवारी वडिलांनी आदित्यला फोन केला, पण त्याने उचलला नाही. त्यामुळे वडिलांनी आदित्यच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले. जेव्हा हा मित्र आदित्यच्या घरी पोहचला तेव्हा दरवाजा बंद होता. यामुळे दरवाजा तोडून आत गेल्यावर आदित्य हा बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बाथरूममध्ये सर्वत्र रक्त दिसत होते. दरम्यान, रात्री आदित्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याला मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. हे दृश्य पाहून आदित्यची बहीण, भाऊजी, वडील यांना अश्रू लपवता आले नाहीत. आदित्यचे पार्थिव सोलापूरहून मुंबई आणि त्यानंतर केरळला नेण्यात येणार असून तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असं नातेवाईकांनी सांगितले.