नवी दिल्ली : म्हैसूर महाराजांच्या निकटवर्तीय राहिलेल्या ब्रिटिश टॅक्सीडर्मिस्टला एका व्यक्तीने ठकविल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच्यावर थेट ईडीनेच कारवाई करत त्याची 117 कोटी रुपयांची संपत्तीच जप्त केली आहे. हा प्रकार या व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. टॅक्सीडर्मिस्ट म्हणजे मृत झालेल्या प्राण्यांच्या चामडीपासून हुबेहूब त्याच प्राण्याची प्रतिकृती तयार करणारा. ईडीने या कारवाईची बुधवारी माहिती दिली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की म्हैसूरमध्येच राहणारा आरोपी आणि घोड्यांचा प्रशिक्षक मायकल एफ. ईश्वर याच्या विरोधात पैशांची अफरातफर केल्याने कारवाई करण्याचा आदेश आला होता. कारवाईवेळी त्याच्याकडून 70 बहुमुल्य ट्रॉफी शिवाय सागाचे फर्निचर, म्हैसरच्या हैदर अली रोडवरील एक घर आणि केरळच्या वायनाडमधील कॉफीचे मळे जप्त करण्यात आले. या संपत्तीची एकूण किंमत 117.87 कोटी रुपये एवढी आहे.