नोएडा येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने त्याची पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा दावा केला आहे. एका पाकिस्तानी युवकासोबत लग्न झालं असतानाही तिने माझ्याशी लग्न केले. लग्नानंतर ३ महिने ती बेपत्ता होती असं पतीने म्हटलं आहे. याबाबत पतीने केंद्र सरकार आणि पोलिसांकडे तपास करण्याची मागणी केली आहे.
नोएडाच्या सेक्टर १०५ मध्ये जज कॉलनीत राहणारे व्यावसायिक लोकेश राठी यांनी दिल्ली आणि नोएडा पोलिसांना याबाबत तक्रार केली आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवूनही तपास करण्याची मागणी केली आहे. लोकेश राठी म्हणाले की, एका मेट्रोमोनियल वेबसाईटवरून डिसेंबर २०१९ साली एका युवतीसोबत माझी ओळख झाली. त्यातून आम्ही लग्न केले. लग्नानंतर काही काळाने १२ मार्च २०२० रोजी ती अचानक बेपत्ता झाली. जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा अनेक खुलासे झाले. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसला. कोरोना काळापासून मी माझ्या पत्नीचा शोध घेत होतो. होळीच्या निमित्ताने ती तिच्या माहेरी गेली होती तिथूनच ती बेपत्ता झाली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती असं त्यांनी सांगितले.
महिलेनेही केली आहे तक्रार
या प्रकरणात संबंधित महिलेनेही व्यावसायिकाविरोधात दिल्लीच्या द्वारका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ असा आरोप तिने पती लोकेश राठीवर केला आहे. याबाबत पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. या आरोपपत्राला लोकेशने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यात घरगुती हिंसाचाराच्या सुनावणीत पत्नी उपस्थित राहत नाही असंही पतीने म्हटलं आहे.
पाकिस्तानी युवकासोबत चीनमध्ये लग्न केल्याचा दावा
२००४ साली एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी पत्नी चीनला गेली होती. चीनमध्ये तिने २००८ मध्ये पाकिस्तानातील युवक अतीकसोबत लग्न केले. या लग्नातून या दोघांना १ मुलगाही आहे. जो सध्या पाकिस्तानात राहतो. चीनमध्ये असताना ही महिला बऱ्याचदा पाकिस्तानात गेली. २०११ साली चीनमधून ती भारतात परतली. त्यानंतर मे २०१२ साली पुन्हा पाकिस्तानात गेली. तिथे ३ महिने १७ दिवस राहिल्यानंतर ती भारतात परतली. त्यानंतर एक आठवडा येथे राहून पुन्हा पाकिस्तानात गेली आणि तिथे ५ दिवस राहिली असा दावा पतीने केला आहे.
व्यावसायिकाला मिळतायेत धमक्या
पत्नी सतत पाकिस्तान आणि भारतात येऊन जाऊन होती. ती दिल्लीसोबत इतर शहरातील लोकांशीही संपर्कात असते. जेव्हा पत्नीचे पाकिस्तानी कनेक्शनबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला अज्ञात नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्याचीही तक्रार पोलिसांना दिल्याचं पती लोकेश राठी यांनी म्हटलं.