किरकोळ वादातून तरुणाची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 06:16 IST2022-01-02T06:16:14+5:302022-01-02T06:16:24+5:30

नेपाळला पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना केली अटक

Murder of a young man by slitting his throat in a minor dispute | किरकोळ वादातून तरुणाची गळा चिरून हत्या

किरकोळ वादातून तरुणाची गळा चिरून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : भांडणाच्या क्षुल्लक कारणावरून दोन आरोपींनी एका २२ वर्षीय तरुणाची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. वालीव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या तरुणाची ओळख पटवून नेपाळला पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना बोरिवली स्थानकातून वालिवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व टीमने अटक केली आहे. या हत्येच्या गुन्ह्याचा १२ तासात वालीव पोलिसांनी उलगडा केला आहे. 
गावराईपाडा येथील अनंतवाडी सेक्टर नंबर २ मध्ये राहणाऱ्या दीपककुमार विश्वकर्मा (२२) या तरुणाची शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गळा चिरून हत्या झाली आहे. दीपककुमार आणि आरोपी गोविंद चौधरी व समीर थापा ऊर्फ बदला यांच्यामध्ये नेहमी काही ना काही कारणावरून मद्य प्राशन करून भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी पूर्वीप्रमाणेच भांडणे होऊन रात्री दोन्ही आरोपींनी दीपकची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. वालीव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी गावराईपाड्याच्या चाळीच्या मोकळ्या मैदानात लाकडी ओंडक्याजवळ एका तरुणाचा मृतदेह मिळून आला. 

पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवून पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना पकडून १२ तासाच्या आत हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट हे करत आहेत.

Web Title: Murder of a young man by slitting his throat in a minor dispute