शेलू येथे मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 23:56 IST2020-06-01T23:56:04+5:302020-06-01T23:56:16+5:30
मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या शेलू गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम साइट आहेत.

शेलू येथे मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील शेलू गावात एका बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुराचा खून झाला आहे. लॉकडाउन असल्याने दोघे मजूर राहत असलेल्या चाळीमधून गप्पा मारण्यासाठी एका कार्यालयाच्या बाहेर रात्री बसले होते. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात एका मित्राने दुसºयाचा खून केला.
मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या शेलू गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम साइट आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग येथून आपल्या मूळ गावी परतला आहे. असे असताना कामे पुन्हा सुरू होतील म्हणून काही मजूर अजूनही थांबून आहेत. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले त्यातील मित्र म्हणून एकत्र राहणारे दोन मजूर हे रविवारी रात्री एकत्र बसले होते.
शेलू- बांधिवली रस्त्यावर असलेल्या माजी उपसरपंच गुरुनाथ मसणे यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या व्हरांड्यात ब्रिजभान यादव (४४) आणि कपिल देव मुन्ना भारती उर्फ सिंघनिया हे एकत्र गप्पा मारत बसले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास वादावादी झाली आणि त्यात ब्रिजभान यादव यांचा मृत्यू झाला. कपिलदेव मुन्ना भारती याने ब्रिजभानच्या डोक्यात मातीची वीट घातल्याने ब्रिजभान यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजता या घटनेची माहिती शेलू पोलिसांना मिळाली.