पती-पत्नीचा दगडाने ठेचून हत्या करून रचला चोरीचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:34 PM2018-08-06T12:34:42+5:302018-08-06T12:38:44+5:30
कन्नड-शिवूर बंगला रस्त्यावरील हसनखेडा (ता. कन्नड) शिवारातील शेतमळ्यातील अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
औरंगाबाद : कन्नड-शिवूर बंगला रस्त्यावरील हसनखेडा (ता. कन्नड) शिवारातील शेतमळ्यातील अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आरोपींनी चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे भासविण्यासाठी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले. मात्र, खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कारभारी रामचंद्र शिनगारे, यमुनाबाई शिनगारे असे खून झालेल्या पती, पत्नीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक येथील ते रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की, हनसखेडा येथील गावातील एक महिला सकाळी १०.३० च्या सुमारास शेतात कामासाठी राजेंद्र दळवी यांच्या शेतातील घरापासून जात असताना त्यांना पती, पत्नीचे मृतदेह घरासमोरील अगंणात रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. त्यांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली. यानंतर त्वरित देवगाव रंगारी पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. काही वेळातच सपोनि. सपना शहापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शिनगारे कुटुंबीय १५ वर्षांपासून राजेंद्र दळवी यांची हसनखेडा शिवारातील गट क्र.७९ मधील शेती अर्ध्या वाट्याने करीत होते. पती, पत्नी रात्री शेतातील राहत्या घरातील अंगणात खाटेवर झोपले होते. रात्री आरोपींनी झोपेतच असताना डोक्यात दगड घालून हत्या केली. मयतांची दोन्ही मुले औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत काम करतात. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अविनाश सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउनि. सचिन कापुरे, पी.एस. मुंडे, विद्या झिरपे, बी. बी. खुळे, के. एन. श्रीखंडे, के. के. गवळी, एस. टी. वाघ, व्ही. एस. धुमाळ, जी. ई. जाधव, राम मोकळे, आर.बी. खोजेकर, अमोल करवंदे, सुनील दांडगे, आर. टी. बुधवंत, रतन वारे, विठ्ठल राख, बाबासाहेब पाथरीकर, गणेश मुले, आशिष जमदाडे, किरण मोरे, बाबासाहेब नवले, शेख नदीम, राजेंद्र जोशी, प्रमोद चाळणे यांच्यासह श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
वीजपुरवठा खंडित करून काढला काटा
सदर मारेकऱ्यांनी रात्री उजेडात ओळख पटू नये म्हणून खून करण्यापूर्वी येथील वीजपुरवठा खंडित केला होता. यानंतर दगडाने ठेचून पती, पत्नीची हत्या करण्यात आली. यानंतर दगड शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तपासाला वेगळी दिशा देण्यासाठी घरातील असलेल्या कपाटातील वस्तू केवळ खाली फेकण्यात आल्या, तसेच कपडे अस्ताव्यस्त करण्यात आले. दरम्यान, मयतांचे शवविच्छेदन हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करणे सुरू होते. अधिक तपास सपोनि. शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. कारभारी गवळी, जमादार खुळे पाटील, पोहेकॉ. एस.जी. गव्हाणे, पोकॉ. दादासाहेब चेळेकर करीत आहेत.