मडगावात दिवसाढवळय़ा सराफाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:32 PM2020-09-02T18:32:48+5:302020-09-02T18:32:58+5:30

हल्लेखोर फरार, व्यापारीवर्गात भितीचे वातावरण

Murder of a day and a half bullion in Madgaon | मडगावात दिवसाढवळय़ा सराफाचा खून

मडगावात दिवसाढवळय़ा सराफाचा खून

Next

मडगाव: मडगावात आज बुधवारी दिवसाढवळय़ा एका सराफाचा खून करण्याची खळबळजनक घटना घडली. स्वप्नील वाळके असे मयताचे नाव असून, भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या सदस्या कृष्णी वाळके यांचा तो मुलगा होता. येथील ग्रेस चर्चच्या मागच्या बाजूला वाळके यांचे कृष्णी ज्वेलर्स नावाचे आस्थापन असून, दुपारी बारा वाजता या आस्थापनात दोघेजण आत शिरले, त्यांच्याकडे रिव्हॉलवर व चाकूही होता. चाकूने वार केल्याने स्वप्नील हा गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर संशयिताने पळ काढला.


जखमी अवस्थेत स्वप्नील याला 108 मदतसेवेच्या अॅम्बुलन्समधून हॉस्पिसियोत दाखल केले असता, त्याला मरण आले. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
दिवसाढवळय़ा घडलेल्या या खूनी हल्ल्यामुळे व्यापारी वर्गातही भितीचे वातावरण पसरले आहे.


हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने या सराफी दुकानात आत शिरले व नंतर स्वप्नीलने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर खुनी हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयिताने हल्ला केल्यानंतर ते पळून गेले. यातील एकाच्या हाती चाकू होता. सराफी दुकानातून मोठमोठय़ाने आवाज ऐकू आल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमले. मात्र एक हल्लेखोर हातात चाकू घेऊन असल्याने त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावण्यासही ते घाबरले. लोकांनी त्याच्यावर दगडही फेकले, त्याही अवस्थेत तो पळून गेला.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग हेही घटनास्थळी दाखल झाले. भादंसंच्या 302 कलमाखाली मडगाव पोलिसांनी खून म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले असून, संशयितांचा शोध चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.
दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा राज्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणो कोसळल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे सांगताना खुन्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.


भाजपा गोवा प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी या खूनी हल्ल्याचा निषेध केला असून, मडगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करुन संशयितांना अटक करावी अशी मागणी केली आहे. मडगावचे नगरसेवक रुपेश महात्मे यांनीही दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेचा निषेध करताना संशयितांना त्वरीत गजाआड करावे अशी मागणी केली आहे.

 

Web Title: Murder of a day and a half bullion in Madgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून