अर्ध्या एकर जमिनीसाठी चुलत भावालाच संपवला; २ भावांनी मिळून डोक्यात दगड घातला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:36 PM2021-11-19T17:36:51+5:302021-11-19T17:37:25+5:30

मुळचे झारखंड येथील रहिवाशी असलेले पुरण महतो हे हातमजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात वास्तव्याला होते.

Murder of a cousin for half an acre of land in Kalyan | अर्ध्या एकर जमिनीसाठी चुलत भावालाच संपवला; २ भावांनी मिळून डोक्यात दगड घातला

अर्ध्या एकर जमिनीसाठी चुलत भावालाच संपवला; २ भावांनी मिळून डोक्यात दगड घातला

Next

डोंबिवली:  गावातील 20 गुंठे जमिनीच्या वादातून दोघा भावांनी चुलत भावाची दगडाने प्रहार करून खून केल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पुरण सिकंदर महतो (वय 47) असे मृत भावाचे नाव असून खून करणा-या दोघांपैकी कालुकुमार सिताराम महतो याला झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. तर त्याचा भाऊ लालुकुमार सिताराम महतो हा फरार आहे. विशेष बाब म्हणजे कालुकुमारला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला  स्थानिक गावक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले, हल्ला देखील झाला परंतू त्यांच्या विरोधाला न जुमानता आरोपीला ताब्यात घेत डोंबिवलीत घेऊन आले.

मुळचे झारखंड येथील रहिवाशी असलेले पुरण महतो हे हातमजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात वास्तव्याला होते. तर त्यांचे चुलत भाऊ कालुकुमार आणि लालुकुमार हे दोघेही गोळवली येथेच इतर ठिकाणी रहात होते. पुरणचा त्याच्या चुलत भावांशी जमिनीवरून वाद होता. या वादातून झारखंडमध्ये त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे देखील दाखल आहेत. दरम्यान पुरणचा काटा काढून हा वाद कायमचा संपवायचा असा डाव दोघा भावांनी आखला. 4 नोव्हेंबरला रात्री कालुकुमार आणि लालुकुमार यांनी पुरणला घरी जेवायला बोलावले. त्याला दारू पाजली. यावेळी जमिनीचा विषय उरकून काढत भांडण केले आणि मारहाण केली.

डोक्यात दगड घातल्याने पुरण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हल्ला करून दोघेही भाऊ पळून गेले. दरम्यान जखमी आणि बेशुध्द अवस्थेत पुरण हा मध्यरात्री 2 वाजता दर्शन पाटील चाळीजवळ आढळुन आला. याची माहीती मानपाडा पोलिसांना देण्यात आली. जखमी अवस्थेतील पुरणला सायन रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी प्रारंभी गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरूवात केली. दरम्यान पूरणचा 8 नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गोळवली परिसरात चौकशी करता त्याच्या चुलत भावांची आणि जमिनीच्या वादाची माहीती मिळाली. तसेच ते झारखंड येथील मुळ गावी गेल्याची माहीती मिळताच डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, ज्ञानोबा सुर्यवंशी, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, भानुदास काटकर, विजय कोळी, पडवळ, पोलिस नाईक प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लपा पाटील, पोलिस शिपाई महेंद्र मंझा, सोपान काकड आदिंचे पथक झारखंडला रवाना झाले आणि त्यांनी कालुकुमारला बेडया ठोकल्या. त्याला 22 नोव्हेंबर्पयत कल्याण सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस पथकावर हल्ला

तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा कल्याण नजीकच्या म्हारळ, शहाडसह  सुरत, अंकलेश्वर, भरूच, भुसावळ याठिकाणी पथके पाठवून शोध घेतला असता त्यांचा शोध लागला नाही. अखेर आरोपी हे त्यांचे मुळगावी गेल्याची माहीती मिळताच पोलिसांचे पथक झारखंड येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता पथकाला स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांना विरोध करताना गावक-यांकडून त्यांच्यावर हल्ले देखील झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाहीत. विरोधाला न जुमानता पोलिस आरोपी कालुकुमारला अटक करून त्याला डोंबिवलीत घेऊन आले.

Web Title: Murder of a cousin for half an acre of land in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.