एका तरुणाला चष्मा न घालणं चांगलंच महागात पडलं आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या अमूल्य शर्माला एका रिक्षाचालकाने गंडा घातला. रिक्षातून उतरल्यानंतर मोबाईलवरून पैसे द्यायचे होते. तेव्हा चालकाने अमूल्यची कमकुवत दृष्टी आणि विश्वासाचा फायदा घेत त्याच्या खात्यातून तब्बल ९०,००० रुपये चोरले. या फसवणुकी प्रकरणात वांद्रे पोलिसांनी रिक्षाचालक फुरकान शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
एफआयआरनुसार, मूळचा हरियाणाची रहिवासी असलेला अमूल्य शर्मा हा एका लॉ फर्ममध्ये काम करतो आणि त्याला चष्म्याशिवाय दिसत नाही. चष्मा नसेल तर त्याला वाचताही येत नाही, मोबाईल वापरण्यासही अडचण येते. त्याच्या मित्रांनी अंधेरीमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं, जिथे अमूल्य चष्मा न घालता गेला होता.
रिक्षाचालकाने मागितले १५०० रुपये
पार्टी संपल्यानंतर अमूल्य रिक्षाने वांद्रे येथील त्याच्या घरी निघाला. मुंबईत नवीन असल्याने त्याला रस्ता नीट माहीत नव्हता, याचाच फायदा घेत रिक्षाचालक त्याला दुसऱ्या मार्गाने वांद्रे येथे घेऊन गेला. घरी पोहोचल्यावर रिक्षाचालकाने १५०० रुपये मागितले. अमूल्यने त्याला फक्त ५०० रुपये देईन असं सांगितलं.
१५०० रुपयांऐवजी टाकले ९० हजार
चष्मा विसरल्यामुळे अमूल्यला रक्कम दिसत नव्हती, रिक्षाचालकाचा मोबाईल नंबरही टाइप करता येत नव्हता. अशा परिस्थितीत त्याने विश्वास ठेवून त्याचा मोबाईल रिक्षाचालकाला दिला जेणेकरून तो स्वतः ऑनलाइन व्यवहार करू शकेल. यावेळी रिक्षाचालकाने मोबाईलमध्ये १५०० रुपयांऐवजी ९० हजार रुपये टाकले आणि अमूल्यला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) विचारला.
बँक स्टेटमेंट तपासले तेव्हा बसला मोठा धक्का
ओटीपी सांगताच फुरकान शेख नावाच्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. काही वेळाने अमूल्यला संशय आला आणि जेव्हा त्याने बँक स्टेटमेंट तपासले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. त्याला समजलं की, त्याच्या खात्यातून ९०,००० रुपये काढले गेले आहेत. त्याने लगेच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फुरकान शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.