Mumbai Crime News: मालाड येथील एका ५४ वर्षीय व्यावसायिकाला दंडाधिकारी न्यायालयाने एक वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. त्याच्यावर एका महिला बँक कर्मचाऱ्यासोबत घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप आहे. महिला बँक कर्मचारी पत्ता पडताळणीसाठी त्याच्या घरी गेली होती. यादरम्यान त्या व्यक्तीने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले.
नेमका काय घडला प्रकार?
एक माणूस बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता. त्याने पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँकेला दिले. त्याच्याकडे फोटो नव्हता. बँकेचा नियम असा आहे की, खाते उघडण्यापूर्वी घरी पत्ता पडताळणी करणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता बँकेची महिला कर्मचारी आरोपीच्या घरी पोहोचली.
महिलेच्या मानेवर, गालावर चुंबन घ्यायला केली सुरूवात
आरोपी त्याच्या घरी एकटाच होता. काम संपवून ती महिला निघणार असताना आरोपीने तिला मागून पकडले आणि तिचे चुंबन घेऊ लागला. तिच्या मानेवर आणि गालावर चुंबन घेतले. त्याने तिला घट्ट धरले आणि तिच्या संपूर्ण शरीराला स्पर्श करू लागला. महिलेने त्याला ढकलले आणि तेथून पळून गेली.
बँकेत सांगितला घडलेला प्रकार, पोलिसांत केली तक्रार
महिला बँकेत परतली आणि बँक मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर आणि एका सहकाऱ्याला तिने या घटनेची माहिती दिली. यानंतर तिने मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला दोन दिवसांनी जामीन मिळाला.
आरोपी दोषी, हजार रूपये दंड, एक वर्षाचा कारावास
न्यायालयाने निकाला म्हटले की, तक्रारदार तिच्या ड्युटीवर असताना पत्ता पडताळणीसाठी आरोपीच्या घरी गेली होती. आरोपी घरी एकटाच होता. त्याने महिला बँक कर्मचाऱ्यावर जबरदस्ती केली आणि तिचा विनयभंग केला. त्यामुळे आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि एक हजाराचा दंड ठोठावण्यात आला. तपासात काही त्रुटी होत्या, परंतु महिलेचे म्हणणे विश्वसनीय होते. तिची विविध प्रकार चौकशी करण्यात आली, तरीही ती तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. ही घटना नोव्हेंबर २०२० मध्ये घडली होती. त्यावेळी महिला २७ वर्षांची होती. न्यायालयाने म्हटले की, अशा घटनेनंतर घाबरणे सामान्य आहे. ती महिला घाबरली होती म्हणून तिने उशिरा तक्रार केली.