MP Crime:मध्य प्रदेशातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सिंगरौली रेल्वे स्थानकाच्या बाथरूममध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. आरोपी हा स्टेशनवरील पार्किंगमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. घटनेच्या वेळी महिलेचा पती चहा घेण्यासाठी स्टेशनबाहेर गेला होता, तेव्हा आरोपीने महिलेवर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर, बलात्कार पीडितेला एफआयआर नोंदवण्यासाठी ३०० किमी प्रवास करावा लागला. पण पीडितेचा त्रास इथेच संपला नाही. पोलीस ठाण्यात महिला अधिकारी नसल्यामुळे पीडितेला तिला तासन्तास पोलीस ठाण्यात बसून राहावे लागले. बऱ्याच वेळाने १०० किमी अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने येऊन पीडितेचा एफआयआर नोंदवला.
सिधी जिल्ह्यातील मडवास येथून उत्तर प्रदेशातील चोपन येथे इंटरसिटी एक्सप्रेसने जाण्यासाठी पतीसोबत निघालेल्या एका महिलेवर सिंगरौली मोरवा रेल्वे स्थानकावर बलात्कार करण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये काम करणाऱ्या देवालाल साकेत नावाच्या आरोपीने हा बलात्कार केला. ही घटना स्टेशनच्या महिला शौचालयात घडली.
महिलेचा पती चहा आणि नाश्ता घेण्यासाठी स्टेशनबाहेर गेला होता आणि महिला फ्रेश होण्यासाठी शौचालयात गेली होती. तेव्हा आरोपी देवालाल तिच्या मागे मागे गेला आणि त्याने महिलेवर अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने महिलेला त्याचे नाव सांगून धमकावले. माझं कोणी काही करु शकत नाही असंही त्याने म्हटलं.
या घटनेनंतर महिलेचा पती परत आला तेव्हा तिने त्याला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर दोघेही तक्रार दाखल करण्यासाठी सिंगरौली जीआरपी पोलीस ठाण्यात गेले. मात्र तिथे महिला पोलीस अधिकारी नसल्यामुळे पीडितेला ३०० किलोमीटर अंतरावर कटनी रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगितले. मात्र तिथेही महिला पोलीस अधिकारी नसल्याने पीडितेला बराच वेळ थांबावं लागलं. त्यानंतर १०० किमीवर असलेल्या जबलपूर येथील एक महिला पोलीस अधिकाऱ्याला बोलवण्यात आलं. त्यानंतर पीडितेचा एफआयआर नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल होताच कटनी येथील जीआरपीने आरोपीला अटक केली आहे. महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी आरोपी देवलाल साकेतला अटक केली आणि न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले. जीआरपी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.