मुंबई - उत्तर प्रदेश येथे 4 खुनाच्या गुन्ह्यासह एकूण 18 गंभीर गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या आरोपीला साकीनाका पोलिसांनीअटक केली आहे. आतिक मोहम्मद रऊफ शेख असे अटक आरोपीचे नाव असून तो मुंबईत नाव बदलून राहत होता. साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रौफ शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, प्रतापगड, उत्तर प्रदेश येथील कुप्रसिद्ध तौकीर टोळीचा नामचीन गुंड आतिक मोहम्मद रऊफ शेख हा उत्तर प्रदेश राज्यातील बजयाच पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी व इतर गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी आहे. 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला रउफ शेख हा सराईत गुन्हेगार साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अफरोज शेख या नावाने राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक कलीम शेख यांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रऊफ शेख व पथकाने आतिक शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली असून आतिक शेख याला लवकरच उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यूपीतील नामचीन गुंडाला साकीनाका पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:36 IST
आतिक मोहम्मद रऊफ शेख असे अटक आरोपीचे नाव
यूपीतील नामचीन गुंडाला साकीनाका पोलिसांकडून अटक
ठळक मुद्देतो मुंबईत नाव बदलून राहत होता. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी व इतर गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी आहे.50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला रउफ शेख हा सराईत गुन्हेगार