धडक कारवाई! तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांचे पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक
By योगेश पांडे | Updated: February 22, 2025 00:04 IST2025-02-22T00:03:58+5:302025-02-22T00:04:46+5:30
नागरिकांनीदेखील संचार सारथी संकेतस्थळावरील चक्षू पोर्टलचा वापरत करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे

धडक कारवाई! तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांचे पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मागील काही कालावधीपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली असून बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड्स घेऊन असे प्रकार सुरू आहेत. हीच बाब लक्षात घेता नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडून चक्षू संकेतस्थळाच्या माध्यमातून तीन दिवसांतच पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत.
केंद्र शासनाकडून संचार सारथी नावाचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यात चक्षू पोर्टल, चोरी गेलेल्या मोबाईल्सबाबत तक्रार, किती मोबाईल क्रमांकांची नावावर नोंदणी आहे याची माहिती, इंटरनॅशनल कॉल ब्लॉक करण्याबाबत, मोबाईल हॅंडसेटची खरी माहिती, वायरलेस इंटरनेटची माहिती अशा सहा सुविधा देण्यात आल्या आहेत. जर सायबर गुन्हेगारांकडून फोन करण्यात येत असेल व तशी शंका आल्यास या संकेतस्थळाच्या माध्यमातून तो ब्लॉक करता येऊ शकतो. सायबर गुन्हेगारांकडून बॅंक खाते, गॅस कनेक्शन, वीज जोडणी, केवाईयस अपडेट, कार्ड एक्सापयरी, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या नावाखाली फसवणूकीचे जाळे टाकण्यात येते. अशा प्रकरणातील क्रमांकदेखील ब्लॉक करता येऊ शकतात.
या पोर्टलच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी तीन दिवसांत ५ हजार ३० मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत. नागरिकांनीदेखील संचार सारथी संकेतस्थळावरील चक्षू पोर्टलचा वापरत करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.