ऑफिसच्या पायऱ्या चढताना केला विनयभंग, आसपासच्या लोकांनी रोडरोमिओला हाणले!
By प्रदीप भाकरे | Updated: September 10, 2023 15:04 IST2023-09-10T15:04:29+5:302023-09-10T15:04:47+5:30
प्रत्यक्षदर्शींनीच बखोटीला पकडून आरोपीला पोलिसांकडे नेले, गुन्हा दाखल

ऑफिसच्या पायऱ्या चढताना केला विनयभंग, आसपासच्या लोकांनी रोडरोमिओला हाणले!
अमरावती: ऑफिसच्या पायऱ्या चढणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका रोडरोमियोला प्रत्यक्षदर्शींनी बेदम चोप दिला. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० च्या दरम्यान शहर कोतवाली हद्दीतील एका कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडित महिलेच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी दुपारी २.२२ च्या सुमारास आरोपी विशाल कंठाळे (२८, आदर्शनगर, गोपालनगर परिसर) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी महिला ही शनिवारी सकाळी कामाच्या ठिकाणी आली. ऑफिसची पायरी चढत असतांना फिर्यादीच्या समोरुन एक अनोळखी मुलगा पाय-या खाली उतरत असतांना तो अचानक तिच्याजवळ आला. त्याने अचानक महिलेच्या ड्रेसवर हात मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. जोरजोराने ओरडल्याने काहींनी त्या अनोळखी इसमाला पकडले. त्याला बेदम चोप देऊन नाव विचारण्यात आले. त्याने स्वत:ची ओळख विशाल कंठाले अशी सांगितली. त्याला प्रत्यक्षदर्शींनीच बखोटीला पकडून शहर कोतवाली पोलीस स्टेशनला आणले. तेथे त्याच्यााविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.