विमान प्रवासात अल्पवयीन मुलीची छेड काढणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:34 IST2019-07-10T00:34:07+5:302019-07-10T00:34:11+5:30
तक्रारदार १७ वर्षीय मुलगी नातेवाइकांसोबत मुंबईवरून दुबईला जात असताना काही दिवसांपूर्वी ही घटना घडली.

विमान प्रवासात अल्पवयीन मुलीची छेड काढणारा अटकेत
मुंबई : मुंबई ते दुबई विमान प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी सुमन बाळ (३५) याला अटक केली आहे. तो खासगी कंपनीत नोकरीला आहे.
तक्रारदार १७ वर्षीय मुलगी नातेवाइकांसोबत मुंबईवरून दुबईला जात असताना काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. तिने केलेल्या तक्रारीनुसार, विमानात बाळ हा तिच्या शेजारी बसला होता. ती झोपली असताना तो तिला अश्लील स्पर्श करीत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने त्याला हटकलेही. मात्र नातेवाइकांना काहीही सांगितले नाही. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाइकांना सांगितला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात दुबईवरून मुंबईत परतल्यानंतर तिने सहार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला.
त्यानुसार, रविवारी प्रवाशाची माहिती मिळताच सहार पोलिसांनी त्याला अटक केली. तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली.