मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दिराने आपल्या वहिनीसह बहुती धबधब्यात उडी मारून आयुष्य संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही असं पाऊल का उचललं ते सांगितलं. दिनेश साहू त्याची वहिनी शकुंतला साहूच्या प्रेमात पडला. त्याने वहिनीला कुंकू लावलं आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत बहुती धबधब्यात उडी मारली.
व्हिडिओमध्ये दोघांनीही मानसिक त्रास होत असल्याचं सांगितलं आणि मृत्यूसाठी कुटुंबातील काही सदस्यांना जबाबदार धरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय दिनेश साहू हा देवरा खटखरी येथील तेलिया बुध गावचा रहिवासी होता. शकुंतला साहू ही त्याची वहिनी होती. तिला तीन लहान मुली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये दिनेशने आम्ही खूप दुःखी आहोत. हिरालाल साहू, राजेंद्र साहू, संतोष साहू, राजकुमार साहू आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आमच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. हात जोडून आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं म्हटलं.
दिनेशच्या काकाने दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला आणि दिनेश १९ जुलै रोजी घराबाहेर पडले होते. आम्हाला दोघेही छत्तीसगडमध्ये असल्याची माहिती मिळाली. बुधवारी दिनेशने त्याच्या स्टेटसवर दोघांचाही फोटो टाकला, ज्यामध्ये तो शकुंतलाच्या भांगेमध्ये कुंकू लावत होता. दोघेही बहुती धबधब्यावर असल्याची माहिती मिळाली. शकुंतलाची आई तिच्या कुटुंबासह तिथे पोहोचली आणि त्यांना आम्हालाही याची माहिती दिली. दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी धबधब्यात उडी मारली.
शकुंतलाचं १५ वर्षांपूर्वी दिनेशचा चुलत भाऊ हिरालाल साहूशी लग्न झालं होतं. हिरालाल साहू म्हणाला की, शकुंतला आणि दिनेशमध्ये कसे संबंध निर्माण झाले हे मला माहित नाही. आम्हाला तीन मुली आहेत. एक ११ वर्षांची आहे, दुसरी ८ वर्षांची आहे आणि तिसरी ४ वर्षांची आहे. दिनेशने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.