आयुष्याचा जोडीदारच उठला जीवावर, पसंत नाही म्हणत आईच्या मदतीने बायकोला पेटवले
By सोमनाथ खताळ | Updated: April 17, 2023 20:43 IST2023-04-17T20:42:53+5:302023-04-17T20:43:09+5:30
बीडमधील घटना, निकिता यांचे वर्षभरापूर्वीच ऋषिकेशसोबत लग्न झाले होते

आयुष्याचा जोडीदारच उठला जीवावर, पसंत नाही म्हणत आईच्या मदतीने बायकोला पेटवले
बीड - तू आम्हाला पास नाहीस. तुला आजार आहे. तो आता नीट होत नाही, असे म्हणत विवाहितेला पेटविले. यात ती ५४ टक्के भाजली असून, जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. हा प्रकार १४ एप्रिल रोजी पेठबीड भागात घडला. याप्रकरणी पती व सासूविरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निकिता ऋषिकेश कांबळे (वय २१, रा. हनुमाननगर एमआयडीसी बीड) असे या विवाहितेचे नाव आहे. निकिता यांचे वर्षभरापूर्वीच ऋषिकेशसोबत लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस तिला सुखाने नांदवले. नंतर तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तू आम्हला आवडत नाहीस. तुला आजार आहे. तुझ्या आईकडे जा आणि दवाखान्यात जाऊन तो बरा करून ये, असे म्हणत तिला मारहाण करण्यात आली. ऋषिकेश हा दारुडा असल्याने तो रोजच मारहाण करतो. ही आजारी असल्याने कोठे कामालाही जात नाही. हिला आयते बसून खायला लागते. हिला जिवंत ठेवून तरी काय उपयोग, असे म्हणत सासू कुसुम एकनाथ कांबळे हिने निकिताच्या अंगावर टर्पन तेल टाकले, तर पती ऋषिकेशने काडीपेटी लावून तिला पेटवले.
हा प्रकार १४ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. परिसरातील लोकांनी तिला तत्काळ रूग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पेठबीड पोलिसांनी डॉक्टरांसमोर तिचा जबाब घेत पती ऋषिकेश व सासू कुसुम कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोउपनि एस. जी. जाधव करत आहेत.