Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता
By मिलिंदकुमार साळवे | Updated: March 23, 2021 16:20 IST2021-03-23T16:18:41+5:302021-03-23T16:20:31+5:30
Mansukh Hiren : एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.

Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता
उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या अँटिलीया इमारतीनजीक जिलेटीन कांड्यासह स्कॉर्पिओ कार आढळली. त्यानंतर तपासादरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन Mansukh Hiren यांचा अचानक मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह आढळला. या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून एटीएसने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे. Accused destroyed SIM card, CCTV; Possibility of further arrest from ATS
The car seized today from Daman is being analysed by FSL in Mumbai: Maharashtra ATS Chief#MansukhHirenpic.twitter.com/YF1uZTVaOr
— ANI (@ANI) March 23, 2021
८ मार्च रोजी सचिन वाझे यांचे एटीएसने जबाब नोंद केले असता त्यांनी मी मनसुख यांना ओळखत नसून मला स्कॉर्पिओबद्दल माहिती नाही असे सांगितले. मात्र, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांच्यावरवर संशयाचे बोट दाखवल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. याप्रकरणी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून काही साक्षीदार कोर्टात सीआरपीसी १६४ अन्वये साक्ष देण्यास तयार आहे. मुख्य आरोपी सचिन वाझे यांचा ट्रान्सीट रिमांडला कोर्टाकडून परवानगी मिळाली असून त्यांची NIA कोठडी २५ मार्चला संपणार आहे. त्यामुळे वाझे यांच्या कोठडीची २५ मार्चला कोर्टात एटीएस अपील दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली.
घटनास्थळी कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. तपास अधिकाऱ्यांना तपासात मृतदेहाच्या अंगावर संशयित आरोपींकडे घेऊन जाणारे कोणतेही पुरावे मिळालेले नव्हते. गुन्हा नोंद केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ८ मार्चला संशयित आरोपी सचिन वाझे यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांनी चौकशीत त्यांच्याविरुद्ध असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सचिन वाझेंचा जबाब खोटा असल्याचे पुरावे एटीएसकडे प्राप्त झाले असून त्यांच्या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे ? याबाबत चौकशी चालू आहे.
तसेच चौकशीत प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिमकारचा शोध लावला. गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड हे मुंबईतील पात्याच्या क्लब आणि बेटिंग घेणाऱ्या व्यक्तीने वाझेंच्या सांगण्यावरून त्याच्याकडे काम करणाऱ्या बुकीने गुजरात येथील त्याच्या ओळखीच्या इसमांकडून प्राप्त केली. ती सिमकार्ड ही गुजरातच्या एका कंपनीच्या नावे खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत ती सिमकार्ड बुकी नरेश गोरने सचिन वाझेच्या सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदेला दिली. गोर यांच्यामार्फत १४ सिमकार्ड मागवलेली. त्यापैकी काही सिमकार्ड ऍक्टिव्ह करून शिंदेकडे दिल्याचे व शिंदेने ती सिमकार्ड इतरांकडे देऊन त्याचा वापर गुन्ह्यात केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. हि सिमकार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरले गेले त्यापैकी काही मोबाईल आणि सिमकार्ड आरोपींनी नष्ट केले असल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे. नंतर एटीएसचे पथक चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दीव दमण येथे तपासकामी रवाना झाले. नंतर गुन्ह्यात वापरलेली व्होल्वो कार आणि संशयित व्यक्तीस २३ मार्चला एटीएसने ताब्यात घेतेले. या व्होल्वो कारची एफएसएल कालिना यांच्याकडून तपासणी सुरु आहे. या गुन्ह्यात संशयितांची सखोल चौकशी झाल्यानंतर आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने बराच परिसर, ऑफिसेस आणि मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज घेण्यात आले आहे. तर इतर महत्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याचे काम सुरु आहे. आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून नष्ट केल्याचे पुरावे देखील समोर येत आहेत. आरोपी विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कर्मचारी असून त्याला २००७ साली वर्सोवा येथे लखनभैय्या कथित चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मे २०२० पासून शिंदे पॅरोलवर आहे. रजेवर आल्यानंतर ते या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे यांच्या संपर्कात असून त्यांच्या बेकायदेशीर कामांत त्यांना सहकार्य करायचा. मनसुख कटात आणखी कोण सहभागी आहेत. तसेच कटाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याबाबत एटीएस सखोल तपास करत आहे. अटक दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे, अशी माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.