लखनौ येथील रहिवासी असलेल्या प्रियंका शर्मा हिचा थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ती तिच्या पती आणि मुलासह थायलंडमधील पटाया फिरण्यासाठी गेली होती. याच दरम्यान, हॉटेलमध्ये तिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. प्रियंकाच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीची हत्या तिचा पती आशिष श्रीवास्तव याने केली आहे.
आशिष श्रीवास्तव आणि प्रियंका शर्मा लखनौमधील वृंदावन येथे राहत होते. दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. प्रियंकाचे वडील सत्यनारायण शर्मा यांनी आरोप केला आहे की, आशिषने त्यांच्या मुलीची हत्या केली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सत्यनारायण शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, लग्नापासूनच आशिष त्यांची मुलगी प्रियंकाला त्रास देत होता. त्यांनी आरोप केला की, आशिषचे विवाहबाह्य संबंध होते, ज्याला प्रियंकाचा विरोध होता. यानंतर आशिषने प्रियंकाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
प्रियंकाने यापूर्वी आशिषविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली होती. प्रियंकाच्या मृत्यूनंतर आता सत्यनारायण शर्मा यांनी राज्यसभा खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याकडे मदत मागितली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रियंका आणि आशिष यांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. प्रियंका पाटणा एम्समध्ये अकाउंट्सचे काम पाहत होती, तर आशिष तिथे सीनियर रेजीडेंट होता. लग्नानंतर आशिषची पोस्टिंग जालौन येथील उरई मेडिकल कॉलेजमध्ये झाली होती.