तोतया पोलीस बनून जोडप्याला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:38 IST2019-04-17T01:38:21+5:302019-04-17T01:38:26+5:30
तोतया पोलीस बनून एका जोडप्याला लुबाडणाऱ्या दुकलीला मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तोतया पोलीस बनून जोडप्याला लुबाडले
मुंबई : तोतया पोलीस बनून एका जोडप्याला लुबाडणाऱ्या दुकलीला मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे अन्य काही साथीदार फरार आहेत़ त्यांचा शोध सुरू आहे. संदेश मालाडकर (४४) आणि सचिन खरबी (३८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गेस्ट हाउस अथवा हॉटेलमध्ये जाणाºया जोडप्यांना अडवायचे. त्यानंतर त्यांच्या घरच्यांना याबाबत सांगण्याची धमकी देत पैसे काढायचे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. गोरेगावमधील एका व्यावसायिकालादेखील त्यांनी असेच पोलीस असल्याची बतावणी करीत अडवले. तसेच त्याच्या पत्नीला त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत सांगण्याची धमकी दिली. व्यावसायिकाने त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्यांनी त्या व्यावसायिकालाच धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडून २० हजारांची मागणीही केली आणि १२ हजार घेऊन पसार झाले. याबाबत व्यावसायिकाने पोलीस तक्रार केली नाही, मात्र गेस्ट हाउस मॅनेजरला याबाबत सांगितले. त्यानुसार ते तिघे पुन्हा हॉटेलजवळ उभे असल्याचे मॅनेजरने पाहिले आणि याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी दोघांना अटक केली़