सूरत - गुजरातच्या सूरत येथील सारोली परिसरात एका इमारतीत ४ महिन्यांपूर्वी मॉडल सुखप्रीत कौर हिनं आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात सूरत पोलिसांनी सुखप्रीतच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. लिव्ह इन पार्टनर महेंद्र राजपूत याच्या अमानुष अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिच्यावर जीव देण्याची वेळ आली असं मृत मॉडलच्या बॅगेत सापडलेल्या एका चिठ्ठीमुळे हा खुलासा झाला.
माहितीनुसार, नाते तोडण्यासाठी लिव्ह इन पार्टनर महेंद्र राजपूत याने मॉडल सुखप्रीतला घरात मारहाणच केली नाही तर तिच्या हातावर ब्लेडने वार केले होते. पायावरही जखमा दिसत होत्या. बॅगेत सापडलेल्या चिठ्ठीमुळे सूरत पोलिसांनी मॉडलचा लिव्ह इन पार्टनर महेंद्र राजपूत याच्याविरोधात आत्महत्येसाठी उकसवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता ४ महिन्यांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. महेंद्र राजपूत फोटोग्राफर असून त्याने १९ वर्षीय मॉडल सुखप्रीत कौर हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप आहे.
मूळ मध्य प्रदेशच्या शिवपुरी इथं राहणारी १९ वर्षीय सुखप्रीत कौर १ वर्षापूर्वी मॉडल बनण्यासाठी सूरतला आली होती. याठिकाणी तिने सारोली इथल्या परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. २ मे २०२५ रोजी रात्री सुखप्रीतने तिच्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या कुटुंबाला ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सुखप्रीत कौरचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. तिच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या सामानाची तपासणी केली त्यावेळी सुखप्रीतने लिहिलेले एक पत्र सापडले. या पत्रात सुखप्रीतने तिच्यासोबत राहणाऱ्या महेंद्र राजपूतवर गंभीर आरोप केले. ज्यात तिला झालेल्या मारहाणीचा, ब्लेडने हातापायावर वार केल्याचा उल्लेख आहे.
सुखप्रीत कौरनं पत्रात काय लिहिलं होते?
मी सुखप्रीत कौर, मी सूरतच्या एका बड्या मॉडेलिंग एजन्सीसोबत मॉडल म्हणून काम करत होती. ६ ऑगस्टला माझी ओळख महेंद्र राजपूत नावाच्या युवकाशी झाली. आम्ही दोघे चांगले मित्र बनलो, लिव्ह इनमध्ये राहू लागलो. जवळपास १ महिन्यांनी त्याने मला त्रास देणे सुरू केले. मी नाराज होऊन त्याला सोडले. परंतु तो मला ब्लॅकमेलिंग करत होता. माझे खासगी फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्याने मला जीवे मारण्याचीही धमकी दिली. ब्लॅकमेल करून मला त्याच्या फ्लॅटवर बोलवायचा. एकेदिवशी त्याने माझ्यावर ब्लेडने वार केले. माझे पाय बांधून ठेवले. तिथून मी कसंतरी पळून घरी आले. त्यानंतरही तो धमकी देत राहिला. जर मी कुणाला काही सांगितले तर जीवे मारेन आणि तुझे फोटो अपलोड करेन असं म्हटलं. त्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची ही वेळ आणली असं सुखप्रीतने पत्रात म्हटलं आहे. आरोपी महेंद्र आणि मृत सुखप्रीत हे दोघांना १ वर्षापासून ओळखत होते असं पोलीस तपासात समोर आले.