- मंगेश कराळेनालासोपारा - ९ डिसेंबर २०१४ रोजी वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील चिकूच्या वाडीतील बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची क्रूरपणे हत्या केली. त्यासोबतच घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही चोरून नेले. या ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येमुळे वाणगाव आणि आसपासच्या परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वाणगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. बोईसरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि आताचे वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली होती. या हत्येचा उलगडा करून आरोपींना पकडण्यासाठी ५ पथकांची स्थापना करण्यात आली.डहाणू तालुक्यातील वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कोटीम गावात नौसिर अरदेशर ईराणी (७६) आणि त्यांची पत्नी नर्गीस नौसिर ईराणी (७४) हे दाम्पत्य अंदाजे ३ ते ४ एकरच्या चिकूच्या वाडीतील बंगल्यात रहात होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी मुंबईत तर डॉक्टर मुलगा अमेरिकेत राहतो. एके दिवशी पैशांसाठी या दाम्पत्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. नौसिर यांच्या डोक्यात लाकडाच्या दांडक्याचा जोरदार फटका मारत स्वयंपाकघरात त्यांची हत्या केली. तर नर्गीस यांची बंगल्याच्या बाहेरील बागेत गळ्यावर वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येची माहिती वाणगाव पोलिसांना मिळाल्यावर प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक फेगडे हे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी धरून १० डिसेंबर २०१४ ला गुन्हा दाखल केला होता.घरी कोण - कोण येते - जाते, याची माहिती आसपासच्या लोकांकडून घेण्याचा प्रयत्न केला तर तेथेही काही माहिती मिळाली नाही. या दाम्पत्याकडे त्यांच्या मुलाने संपर्कासाठी दिलेला मोबाइलही चोरी झाल्याचे मुलीने सांगितले. या मोबाइलचा शोध घेतला आणि त्यानेच शेवटी आरोपींपर्यंत पोहोचवले. पोलिसांनी मोबाइल नंबरचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी टाकले होते. चोरट्यांनी त्यांच्याजवळील सीम कार्ड त्यात टाकले आणि त्याचे लोकेशन गुजरात राज्यातील सूरत इथे असल्याचे कळल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींना त्या मोबाइलसह पकडून आणले. पहिले ३ दिवस त्याने चौकशीत सहकार्य केले नाही. पण चौथ्या दिवशी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पैशांसाठी या दाम्पत्याचा खून केल्याचे कबूल केले.आरोपी मोहम्मद रफिक आदम शेख उर्फ रबेन उर्फ रवी रामखिलावसिंग ठाकूर (३१) हा इराणी दाम्पत्याच्या घरी १० वर्षांपूर्वी कामाला होता. त्यांच्याकडे काम करणाºया कामगाराचा हा मुलगा. तेव्हा आरोपी शाळेत होता. पण, लहानपणापासून घरात छोट्यामोठ्या चोºया करण्याची त्याला सवय होती. त्याला वडिलांनी अनेकदा सज्जड दम देत मारही दिला. पण, एके दिवशी रवी घरात चोरी करत असताना त्याच्या वडिलांनी रंगेहाथ पकडले आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर तो गुजरातला पळून गेला. तेव्हापासून तो कोणाच्याही संपर्कात नव्हता. तो सूरत येथील एका मुस्लिम परिवारासोबत रहात होता. आणि लहानमोठी कामे करत होता. त्याने त्याच घरातील मुलीशी लग्न केले आणि धर्मांतरही. नंतर कुटुंब वाढल्याने त्याची पैशांची गरज वाढली. कालांतराने तो कर्जबाजारी झाला. पैशांची चणचण तसेच पैसे कुठून मिळतील, या विचाराने त्याने चोरीचा प्लॅन आखला.
संपत्तीच्या हव्यासाने घेतला जीव, वृद्ध दाम्पत्याच्या क्रूर हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 23:34 IST