Varanasi court: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील न्यायालयीन संकुलात वकिलांच्या एका गटाने पोलीस उपनिरीक्षक आणि एका हवालदारावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जमिनीच्या वादाच्या प्रकरणात शांतता भंग केल्याबद्दल एका वकील आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर तीन खोल जखमा आहेत तर संपूर्ण शरीरावर १३ जखमा आहेत.
वाराणसी कोर्टहाऊसमध्ये मंगळवारी वकिलांनी एका पोलीस निरीक्षकावर आणि कॉन्स्टेबलला घेरले आणि त्यांना बेदम मारहाण केली. वकिलांनी पोलीस निरीक्षकाचा गणवेश देखील फाडला होता. त्यांना गंभीर अवस्थेत बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात घबराट पसरली. जिल्हा दंडाधिकारी सत्येंद्र सिंह आणि डीआयजी शिवहरी मीणा वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओद्वारे दोषींची ओळख पटवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक मिथिलेश प्रजापती हे गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत रिमांड स्लिप मिळविण्यासाठी दुपारी अडीच वाजता कोर्टाच्या कार्यालयात आले होते. फॅमिली कोर्टाच्या समोरील इमारतीच्या तळमजल्यावरील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कार्यालयाजवळ अचानक वकिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. स्वतःचे रक्षण करण्यासाठी, निरीक्षक अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कार्यालयात घुसले आणि दरवाजा बंद केला. वकिलांनी दरवाजा ढकलण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त कँट नितीन तनेजा आणि स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर शिवकांत मिश्रा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वकिलांना दाराबाहेर काढण्यास सुरुवात केली. वकिलांनी धक्काबुक्की करून जबरदस्तीने दार उघडले. त्यांनी ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या कोर्ट क्लर्क रामा प्रसाद यांनाही इन्स्पेक्टर समजून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मिथिलेश प्रजापती यांना मारहाण करत बाहेर काढले. यादरम्यान मिथिलेश नाल्यात पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले.
दरम्यान, जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला होता. मोहित कुमार सिंग नावाच्या एका व्यक्तीचा आरोप आहे की तात्पुरत्या स्थगितीच्या आदेशानंतरही जमिनीवर बांधकाम सुरू होते. तर प्रेमचंद मौर्य यांचा दावा होता की ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जमिनीवर कायदेशीर बांधकाम करत होते. दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वी अनेक वाद झाले आहेत आणि २८ जून २०२५ रोजी दोन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले. १३ सप्टेंबरला सुनावणीच्या दिवशी दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर परिस्थिती आणखी चिघळली. दोन्ही पक्षांवर शांतता भंग केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी एका पोलीस निरीक्षकाने वकिलावर हल्ला केल्याचा आरोप होता. या घटनेमुळे वकिलांमध्ये मिथिलेश प्रजापतींविरुद्ध संताप निर्माण झाला होता. मंगळवारी जेव्हा प्रजापती जेव्हा कोर्टात गेले तेव्हा त्यांना घेराव घालून हल्ला करण्यात आला.