पिंपरी : फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे दिपककुमार गुप्ता यांचे आर्थिक व्यवहारातील वादातून तीन आरोपींनी संगनमताने चिंचवड येथून शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपहरण केले. जोपर्यंत रककम मिळत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, अशी भूमिका घेत आरोपींनी गुप्ता यांना ऊर्से येथे डांबुन ठेवले. गुप्ता यांच्याकडे काम करणाऱ्या कामगाराने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुप्ता यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपककुमार गुप्ता या व्यावसायिकाला आरोपींनी शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास इंदिरानगर, चिंचवड येथून जबरदस्तीने मावळातील ऊर्से या ठिकाणी नेले. तेथे त्यांना डांबुन ठेवले. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत कोठही जाऊ देणार नाही. असा पवित्रा घेऊन शुक्रवारपासून त्यांनी गुप्ता यांना आपल्या निगराणीखाली ठवेले. या राऊत, ठाकूर आरोपींची नावे आहेत. गुप्ता यांच्या फॅब्रिकेशन दुकानातील कामगार गणेश शंकर पवार (वय ३४,रा. चिंचवड) याने गुप्ता यांचे अपहरण झाल्याची फिर्याद चिंचवड पोलिसांकडे दाखल केली होती. गुप्ता यांनी ऊर्से येथे फॅब्रिकेशनचे काम घेतले होते. आरोपी आणि गुप्ता यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीचा व्यवहार झाला होता. गुप्ता यांच्याकडून आरोपींना काही रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र गुप्ता ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. देय रकमेबाबत प्रतिसाद देत नव्हते. भेट घेण्याचे टाळत होते. त्यामुळे गुप्ता यांना ऊर्से येथे नेले असे आरोपींचे म्हणणे आहे. गुप्ता यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना ऊर्से येथे ठेवले. दिवसभर त्यांना एका आरोपीच्या मोबाईल दुकानात बसवुन ठेवले जायचे. रात्री दुसऱ्या आरोपीच्या घरी मुक्कामासाठी नेले जायचे. त्यांना मारहाण केली नाही. मात्र, चार दिवस आरोपींनी निगरानीखाली ठेवले. स्वत:च्या मजीर्ने गुप्ता यांना कोठेही जाऊ दिले जात नव्हते. आरोपी कायम गुप्ता यांच्यावर लक्ष ठेऊन होते. चिंचवड पोलिसांनी अखेर आरोपींच्या ताब्यातून गुप्ता यांची सुटका केली.
आर्थिक व्यवहाराच्या वादातून अपहरण व्यावसायिकाची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:22 IST
फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे दिपककुमार गुप्ता यांचे आर्थिक व्यवहारातील वादातून तीन आरोपींनी संगनमताने चिंचवड येथून शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपहरण केले.
आर्थिक व्यवहाराच्या वादातून अपहरण व्यावसायिकाची सुटका
ठळक मुद्देअपहरण झाल्याची फिर्याद चिंचवड पोलिसांकडे दाखल जोपर्यंत रककम मिळत नाही, तोपर्यंत सोडणार नाही अशी आरोपींची भूमिका