सध्या ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशातच कर्नाटकातील मंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बंगाराकुलूर येथील पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याने आपल्या क्यूआर (QR) कोडचा वापर करून ५८ लाख रुपयांची फसवणूक केली. हा कर्मचारी २ वर्षांपासून क्यूआर कोडद्वारे आपल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत होता. याबाबत माहिती उघडकीस येताच पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव मोहनदास आहे. आरोपी पंप कर्मचारी मंगळूरमधील बंगाराकुलूर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपावर पर्यवेक्षक होता. तो मंगलोरमधील बाजपे येथील रहिवासी आहे. तो जवळपास १५ वर्षांपासून पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने २ वर्षात ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आरोपीने ग्राहकांच्या पेमेंटसाठी पंप मालकाकडून लावण्यात आलेला क्यूआर कोड काढून स्वतःच्या बँक खात्याचा क्यूआर कोड लावला होता. परिणामी, ग्राहकाने दिलेले पैसे आरोपी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित होत होते. मोहनदासने १० मार्च २०२० रोजी आपल्या बँक खात्याचा क्यूआर कोड पंपावर लावला होता. मोहनदासने १० मार्च २०२० रोजी आपल्या बँक खात्याचा क्यूआर कोड पंपावर लावला होता. याबाबत माहिती उघडकीस येताच त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पेट्रोल पंप कंपनीचे व्यवस्थापक संतोष मॅथ्यू यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मंगळुरू येथील सायबर क्राइम अँड इकॉनॉमिक स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोहनदासला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी मोहनदासने १० मार्च २०२० ते ३१ जुलै २०२२ पर्यंत क्यूआर कोड बदलला होता. या काळात आरोपींने जवळपास ५८ लाख रुपयांचा अपहार केला.