Karnataka Crime: कर्नाटकातून विवाहबाह्य संबंधांचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील चिक्कमंगलुरुमध्ये दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ६० वर्षीय सुब्रमण्यम यांच्या हत्येप्रकरणी त्यांची ५६ वर्षीय पत्नी, तिचा प्रियकर आणि इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. पत्नीवर तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. सर्व आरोपी कदूरचे रहिवासी असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्नीने २ जून रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत सुब्रमण्यम यांची पत्नी मीनक्षम्मा, तिचा प्रियकर प्रदीप आणि त्याचे दोन साथीदार सिद्धेश आणि विश्वास हे या हत्येत सहभागी होते. मृताच्या पत्नीने हिने २ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, सुब्रमण्यम ३१ मे रोजी कामावर गेल्यानंतर घरी परतलेच नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृताच्या मोबाईल फोनचे लोकेशन शोधले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून घटना उघडकीस ३ जून रोजी रेल्वे पोलिसांनी कदूर पोलिसांना माहिती दिली की, त्यांना रेल्वे ट्रॅकवर अर्धा जळालेला पाय सापडला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम राबवली आणि शरीराचे इतर अवयवही जप्त केले. मृताच्या दुकानाजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरुन कर्नाटक पोलिसांना कळले की, मृतक ३१ मे रोजी प्रदीप, सिद्धेश आणि विश्वास यांच्यासोबत कारमधून कुठेतरी जात होता. त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिस चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली.
मीनाक्षम्मा आणि प्रदीपचे प्रेमसंबंध आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्यांनी सुब्रमण्यमची हत्या केली आणि त्याचा मृतदेह फेकून दिला. तपास पुढे सरकत असताना पोलिसांना असेही कळले की, आरोपी पत्नी मीनक्षम्मा आणि प्रदीप यांचे प्रेमसंबंध होते. सुरुवातीला पोलिसांना पत्नीवर संशय नव्हता. परंतु प्रदीप आणि त्याच्या साथीदारांची चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की, तिचाही हत्येत सहभाग होता.
दारुच्या नशेत गळा दाबून मारलेपोलिसांनी सांगितले की, ३१ मे रोजी प्रियकर आणि त्याच्या साथीदारांनी मृताला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे दारू पाजली. यावेळी मद्यधुंद प्रियकराने मृताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन फेकले. भटक्या कुत्र्याने मृताचा पाय रेल्वे ट्रॅकवर आणल्याने प्रकरणाचा खुलासा झाला.