लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिग बॉसने प्रसिद्ध झालेले अभिनेते आणि आरजे प्रीतम सिंह यांच्यावर हल्ला करणारे शिवसेनेचे माजी पदाधिकारी करण तुली आणि त्याच्या मित्राविरुद्ध कपिलनगर पोलिसांनी माराहाणीचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणानंतर करण आणि त्याच्या मित्रांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रीतमने सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्री कंगना रणावत यांचे सोशल मीडियावर समर्थन केले होते. या कारणाने तुली नाराज होता. काही दिवसांपूर्वी प्रीतम नागपुरात आपल्या घरी आला होता. हल्ल्याची घटना २६ डिसेंबरच्या रात्रीची आहे. प्रीतम सिंह हे मित्र गुरुप्रीत भंडारी यांच्यासोबत जात होते. कपिलनगरात करण तुलीने प्रीतमला आवाज देऊन बोलाविले आणि कंगना रणावतला समर्थन का दिले, अशी विचारणा करीत मित्र रिची शेठीच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर करण हा प्रीतमच्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये गेला. त्या ठिकाणी प्रीतमचे आई-वडील आणि बहिणीला शिवीगाळ करून धमकी दिली. करणने शिवसेनेच्या नावाने धमकी दिल्याने प्रीतम घाबरला होता. प्रीतमने या घटनेची तक्रार दुसऱ्या दिवशी कपिलनगर ठाण्यात नोंदविली. घाबरल्याने त्याने पोलिसांना खरी बाब सांगितली नाही. या कारणाने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता.
प्रीतमने २८ डिसेंबरला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनेची तक्रार केली होती. त्यानंतर कपिलनगर पोलिसांनी प्रीतम आणि करणला चौकशीसाठी बोलविले होते. कारवाईची माहिती मिळताच करण भूमिगत झाला. प्रीतमची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर करण तुली आणि रिची सेठीविरुद्ध माराहाण आणि धमकीचा गुन्हा नोंदविला.
करण तुली पूर्वीही वादात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रामदासपेठ येथील हॉटेल संचालक आणि त्याच्या मुलाला माराहाणीच्या प्रकरणात चर्चेत आला होता. तो स्वत:ला शिवसेनचा पदाधिकारी असल्याचे सांगतो. त्या कारणाने लोक त्याची तक्रार करीत नाहीत. प्रीतम सिंहचे आई-वडील वयस्क आहेत. त्यांना धमकी देण्याचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात हल्ला करणारा करण आणि त्यांच्या मित्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.