प्रेम प्रकरणामुळे जीव गमावलेल्या आकांक्षाने ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्याच सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून बॉयफ्रेंड सूरजने तो यमुना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सूरजला अटक करण्यात आली आहे. आकांक्षाचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी यमुना नदीत शोध मोहीम सुरू केली आहे.
हनुमंत विहार पोलीस ठाण्याचे अधिकारी राजीव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर देहातमधील सुजनीपूर गावातील रहिवासी असलेल्या आकांक्षाचा मृतदेह पोलीस बांदा, चित्रकूट आणि फतेहपूर येथील यमुना नदीत शोधत आहेत. या जिल्ह्यांमध्ये अलिकडच्या काळात यमुना नदीत सापडलेल्या अज्ञात महिलांच्या मृतदेहांबद्दलही माहिती गोळा केली जात आहे. आतापर्यंतच्या पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, सूरजने अनेक मुलींना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं.
जेव्हा आकांक्षाला हे समजलं तेव्हा तिने या सर्व गोष्टींना विरोध केला. सुरुवातीला त्याने पुन्हा असं न करण्याचं आश्वासन दिलं, परंतु नंतर त्याने मुलींशी बोलणं थांबवलं नाही. २१ जुलै रोजी संध्याकाळी दोघांमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये भांडण झालं. त्यानंतर सूरजने तिची हत्या केली. पोलीस तपासात असं समोर आलं की, हत्येनंतर सूरजने त्याचा मित्र आशिषला फोन करून घरी बोलावलं.
सूरजने मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि त्याच्या बाईकवर ठेवला. त्यानंतर ते चिल्ला घाटावर पोहोचले, मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. २० वर्षीय आकांक्षा तिच्या मोठ्या बहिणीसोबत बारा येथे राहत होती. तिला इन्स्टाग्रामवर तिची सूरजशी ओळख झाली. पुढे ते प्रेमात पडले. सूरजच्या सांगण्यावरून तिने तिथली नोकरी सोडली आणि हनुमंत विहारमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पण सूरजनेच आता तिचा जीव घेतला आहे.