लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी विशाल चौकशीत उलटसुलट माहिती देत असल्याने त्याच्या चौकशीकरिता आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, ही मागणी फेटाळत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी विशाल आणि त्याची पत्नी साक्षीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता गवळीने वापरलेली बॅग अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. बुलढाण्याला पळून जाताना मोबाइलसह सीमकार्ड कसारा घाटात फेकल्याचे सांगणाऱ्या गवळीने मोबाइल दीपक तायडे नावाच्या एका लॉज मालकाला पाच हजार रुपयांना विकल्याचे उघड झाले. या व अन्य काही मुद्द्यांची चौकशी अद्याप बाकी असल्याने गवळीची आणखी तीन दिवस पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी ती फेटाळून लावली.
आरोपीचे वकील संजय धनके म्हणाले की, आरोपीच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. त्याच्या जीवाला धोका आहे. त्यांना संरक्षण द्यावे. त्यावर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली.
आरोपी विशाल गवळी राहत असलेल्या इमारतीला नोटीस बजावणार
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी राहत असलेल्या इमारतीला नाेटीस बजावणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांची शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. - त्यावेळी आठवले यांनी आयुक्त जाखड यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून गवळी राहत असलेली इमारत धोकादायक आहे. ही इमारत जमीनदोस्त करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याबाबत जाखड यांनी सांगितले की, गवळी राहत असलेल्या इमारतीला यापूर्वीच महापालिकेने धोकादायक असल्याची नोटीस दिली होती. - त्यानंतर इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र दुरुस्तीसंदर्भात पुरावे महापालिकेस सादर केलेले नाही. दुरुस्तीचे पुरावे महापालिकेस सादर करण्याची नोटीस दिली जाईल. पुराव्यांची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
‘आकासोबत तळोजा कारागृहात ठेवू नका’
विशाल गवळी व त्याच्या पत्नीची रवानगी न्यायालयीन कोठडीत होताच गवळीला आधारवाडी कारागृहात पाठवा. तळोजा कारागृहात त्याचा आका आहे, असा टोला माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी माजी आ. गणपत गायकवाड यांचे नाव न घेता लगावला. गवळी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप महेश यांनी केला होता. त्यांचा आरोप भाजपने खोडून काढला होता.
एन्काउंटरच्या भीतीने तो झोपलाच नाही
विशाल गवळी २५ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत होता. या काळात पोलिस बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणे एन्काउंटर करतील, अशी भीती त्याला वाटत होती. या भीतीपोटी तो झोपला नाही.
फाशी देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
आरोपींना जेव्हा न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयात पीडित मुलीचे आई-वडील उपस्थित होते. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली.