धाराशिव - कळंबमधील महिलेच्या हत्याकांडात पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. या महिलेच्या हत्येची कबुली आरोपींनी दिली आहे. मुख्य आरोपीने मानसिक, शारीरिक टॉर्चर आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेची हत्या केल्याचं पोलिसांकडे कबुली दिली. त्यात मृत महिलेच्या नावावर कोट्यवधीची प्रॉपर्टी असल्याचं उघड झाले आहे.
मनीषा बिडवे ही अनेक नावाने वावरत होती. मुख्य आरोपी असलेल्या रामेश्वरलाही ती आपले लग्न झाल्याचे फोटो आहेत असे म्हणायची. कळंब ठाण्यातही ती काहीवेळा तक्रार करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येते. तक्रार देते म्हणून तिने अनेकांना ब्लॅकमेलिंग केले. त्यातूनच तिने लाखो रूपये उकळल्याचं समोर आले आहे. या सर्व प्रकारातून महिलेने कळंबमध्ये पाऊण कोटीच्या घरात किंमत असलेले २ रो हाऊस, आडस येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स कमावल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंध नाही
मागील २ दिवसांपासून मनीषा बिडवे प्रकरणाचा संबंध केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाशी जोडला जात आहे. यातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याने दिलेल्या जबाबावरून हा खून वैयक्तिक कारणातून झाला आहे. त्याचा सरपंच संतोष देशमुख प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले. काही मंडळींनी कोणतीही खातरजमा न करता या दोन्हीही प्रकरणाचा संबंध जोडल्याने गोंधळ झाल्याचे समजते.
उस्मानला दिली माहिती पण प्लॅन अपूर्ण...
मनीषाचा खून केल्यानंतर रामेश्वरला पुढे काय करायचे हे लक्षात येईना. घरात तसाच मृतदेह ठेवून तो दिवशी गऱाला कुलूप लावून केजला गेला. तिथे मित्र उस्मानला घटनेची माहिती दिली. दोघेही घटनास्थळी आले मात्र मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने ते निघून गेले. रामेश्वरने त्याचा मोबाईल उस्मानकडे दिला. मनीषाच्या मोबाईलमध्येही रामेश्वरचे नग्न फोटो, आक्षेपार्ह व्हिडिओ होते. त्यामुळे रामेश्वरने तो मोबाईल फरार होताना सोबत नेला. पण त्या काळात पैसे संपल्याने त्याने एका ठिकाणी तो मोबाईल विकल्याचं तपासात सांगितले. तो मोबाईल ट्रॅक करून जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील काही माहिती मोबाईलमध्ये आढळून येईल असा अंदाज पोलिसांना आहे.
डोक्यात घाव, म्हणाली मला दवाखान्यात घेऊन चल...
रामेश्वर आणि मनीषा यांच्यात घटनेच्या दिवशी वाद झाला. रागाच्या भरात रामेश्वरने तिच्या डोक्यात हातोडा मारला. मनीषाच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्यातून रक्त वाहत होते. मला खूप लागलंय, दवाखान्यात घेऊन चल असं ती म्हणाली. परंतु रागात रामेश्वरने तिला तिथेच ठेवले. त्यानंतर प्रचंड रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.