पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर

By सुरेंद्र राऊत | Published: August 19, 2022 11:28 PM2022-08-19T23:28:32+5:302022-08-19T23:33:09+5:30

यापूर्वी तीन वेळा वैशाली यांना संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने दोनही प्रयत्न अयशस्वी झाले.

Journalist husband turns out to be the mastermind of stabbing wife; Three arrested including husband, four days of PCR | पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर

पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर

googlenewsNext

यवतमाळ : तालुक्यातील बेलोरा फाटा येथे जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेवर गुरुवारी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी चाकूहल्ला झाला. या हल्ल्याचा मास्टरमाईंड जखमी शिक्षिकेचा पतीच असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली. आरोपी पती हा नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाचा चंद्रपूर येथील जिल्हा प्रतिनिधी आहे. जितेंद्र मशारकर असे मास्टरमाईंड पतीचे नाव असून, त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणात आतापर्यंत पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

संजय राजेश पट्टीवार (रा.लालपेठ, चंद्रपूर), महम्मद राजा अब्बास अन्सारी (रा.चंद्रपूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या उर्वरित दोन आरोपींची नावे आहेत. वणी तालुक्यातील नायगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली चल्लावार या शाळा सुटल्यानंतर गुरुवारी सायंकाळी चंद्रपूर येथे परत जाण्यासाठी बेलोरा फाट्यावर बसची वाट पाहत असताना अचानक एका अज्ञाताने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यात त्यांच्या कानाजवळ जबर दुखापत झाली. 

ही घटना घडत असताना याच ठिकाणी काही विद्यार्थिनी व नागरिक उभे होते. हल्ला होताच, या ठिकाणी गोंधळ उडाला. काहींनी आरडाओरड केली. हल्ला करून आरोपी रस्त्यालगतच्या शेतात पळून गेला. यानंतर, माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आणि नागरिकांनी आरोपी महम्मद राजा अब्बास याला शेतातून ताब्यात घेतले. पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य आरोपींची नावेदेखील पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारीच संजय राजेश पट्टीवार याला ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता, हल्ल्यात जखमी झालेल्या वैशाली यांचा पती जितेंद्र मशारकर हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची बाब समोर आली. त्यावरून शुक्रवारी पोलिसांनी जितेंद्र मशारकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

वैशालीवर हल्ला करण्यासाठी जितेंद्र मशारकर याने हल्लेखोरांना पैसे देण्याचे आमिष दाखविले होते, ही बाबदेखील तपासातून पुढे आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपींना वणी न्यायालयापुढे उभे केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हल्ल्यातील चाकू अद्याप हाती लागलेला नसून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन कऱ्हेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांदुरे करीत आहेत.

पत्नीला संपविण्याचा यापूर्वी तीनदा झाला प्रयत्न -
यापूर्वी तीन वेळा वैशाली यांना संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने दोनही प्रयत्न अयशस्वी झाले. मागील काही महिन्यांपासून सातत्याने हल्ले होत असल्याने वैशालीने यासंदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिले होते. हे सगळे घडत असताना या घटनांमागे पतीचाच हात असल्याची तसूभरही शंका वैशाली यांना कधीच आली नव्हती.
 

Web Title: Journalist husband turns out to be the mastermind of stabbing wife; Three arrested including husband, four days of PCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.