राजस्थानमधील बहुचर्चित साध्वी प्रेम बाईसा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता २० दिवसांनंतर मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटीला महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर, जोधपूरच्या बोरानाडा पोलिसांनी कंपाउंडर देवी सिंह राजपुरोहित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इंजेक्शन देण्यात झालेला हलगर्जीपणा आणि आरोपीचे वारंवार बदलणारे जबाब यामुळे या मृत्यूचे गूढ उकलण्यास मदत झाली आहे.
नेमकी घटना काय?
गेल्या २८ जानेवारी रोजी साध्वी प्रेम बाईसा यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यावेळी कंपाउंडर देवी सिंह याने त्यांना 'डेक्सेना' आणि 'डायक्लोफेनिक' यांसारखी इंजेक्शन दिली होती. मात्र, ही औषधे 'H-शेड्यूल' श्रेणीतील असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ती देणे बेकायदेशीर आहे. या उपचारानंतर साध्वींची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती.
एसआयटीच्या तपासात फुटले भांडे
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने गेल्या २० दिवसांत साध्वींचे वडील, आश्रमातील कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. तपासादरम्यान कंपाउंडर देवी सिंह याने पोलिसांना वारंवार चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने ही इंजेक्शन एका मेडिकल स्टोअरमधून घेतल्याचा दावा केला होता, मात्र मेडिकल स्टोअर मालकाने असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगत कंपाउंडरचा खोटारडेपणा उघड पाडला.
बुलडोजर कारवाई की कायदेशीर फास?
वैद्यकीय मंडळाचा अहवाल आणि एफएसएलच्या तपासणीत असे स्पष्ट झाले की, दम्याचा त्रास असलेल्या रुग्णाला ही इंजेक्शन देणे अत्यंत धोकादायक होते. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आता भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) नुसार 'हलगर्जीपणामुळे मृत्यू ओढवल्याचा' गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
अटकेची तयारी पूर्ण
बोरानाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवी सिंह याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा झाले असून त्याची कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
Web Summary : Sadhvi Prem Baisa's suspicious death case takes a turn. SIT investigation reveals a compounder gave wrong injections, leading to her death. Police investigation underway.
Web Summary : साध्वी प्रेम बाईसा की संदिग्ध मौत का मामला नया मोड़। एसआईटी जांच में कंपाउंडर द्वारा गलत इंजेक्शन देने से मौत का खुलासा। पुलिस जांच जारी।