टोकियो : जपानमध्ये चोरी आणि बत्काराचा गुन्हा असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलीस ठाण्यातून पोलीस अधिका-याचे बूट चोरुन पळ काढला आहे. दरम्यान, या चोरट्याला पकडण्यासाठी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. जूनया हिदा असे या चोरट्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. 30 वर्षीय जूनया हिदा गेल्या रविवारी आपल्या वकीलाची भेट घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातून फरार झाला. त्यावेळी त्याचा हातात बेड्या ठोकल्या नव्हत्या. त्यामुळे ही चूक पोलीस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची असल्याचे समजते. कारण, जूनया हिदाला वकीलाची भेट घेण्यासाठी एकट्यालाच सोडले होते. वकील निघून गेल्यानंतर जवळपास दोन तासानंतर जूनया हिदा पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच, यावेळी त्याने स्वत:चे चप्पल ठेवले आणि पोलिसांचे बूट घालून पळ काढला.दरम्यान, जपानमध्ये क्राइम रेट कमी आहे आणि त्यामध्ये एखादा कैदी पळून जाणे, म्हणजे मोठी बाब आहे. याआधी एप्रिल महिन्यात एक कैद्याने जेलमधून पळ काढला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठे अभियान सुरु केले होते. त्यानंतर त्याला तीन आठवड्यात पकडण्यात आले होते. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी जूनया हिदाला आणि त्याच्या वकीलाला अटक करण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तयार करण्यात आली आहे.
'त्या' चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:29 IST