Bengaluru Crime: माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीची काळजी कोण घेणार? या एका विचाराने पछाडलेल्या एका ७६ वर्षीय निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने आपल्या ६३ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. बंगळुरूमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. व्हाईटफील्ड परिसरातील एका हाय-प्रोफाईल सिनीअर लिविंग कम्युनिटीमध्ये राहणाऱ्या इस्रोच्या माजी शास्त्रज्ञाने पत्नीचा खून केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नागेश्वर राव (७६) असे आरोपी पतीचे नाव असून ते इस्रोमध्ये टीम लीडर म्हणून निवृत्त झाले आहेत. बुधवारी सकाळी १०:१५ च्या सुमारास त्यांची पत्नी संध्या श्री स्वयंपाकघरात दुपारचे जेवण बनवत होत्या. यावेळी नागेश्वर राव यांनी पाठीमागून येऊन अंघोळीच्या टॉवेलने त्यांचा गळा आवळून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले.
हत्येमागचे विचित्र कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश्वर राव हे गेल्या काही काळापासून मानसिक तणाव आणि नैराश्याखाली होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मी अजून ३-४ वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही, मग माझ्या पश्चात माझ्या पत्नीचा सांभाळ कोण करेल? आमचे जवळचे नातेवाईकही शहरात नाहीत, अशा विचारातून त्यांनी आधी पत्नीला मारण्याचा आणि नंतर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पत्नीच्या मृत्यूनंतर ते घाबरले आणि त्यांनी आत्महत्येचा विचार सोडून दिला.
शेजाऱ्याला फोन करून दिली कबुली
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर नागेश्वर राव सुमारे २० मिनिटे मृतदेहाजवळ बसून होते. त्यानंतर त्यांनी आपल्या शेजाऱ्याला फोन करून सांगितले की, मी माझ्या पत्नीला मारले आहे, प्लिज घरी ये. सुरुवातीला शेजाऱ्याला हा विनोद वाटला, मात्र वारंवार तेच सांगितल्यावर शेजाऱ्याने घरी धाव घेतली. तिथे संध्या श्री यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता.
अटकेची कारवाई
ज्या द व्हर्च्युओसो अपार्टमेंटमध्ये ते राहत होते, तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी २४ तास रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची सोय आहे. डॉक्टरांनी तपासून संध्या श्री यांना मृत घोषित केले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा नागेश्वर राव सोफ्यावर शांत बसले होते. त्यांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला. हे दाम्पत्य मूळचे आंध्र प्रदेशचे असून ३ वर्षांपूर्वीच त्यांनी हा फ्लॅट घेतला होता. त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत स्थायिक असून तिला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
गोविंदराजनगरमधील दुसरी घटना
बंगळुरूमध्येच दुसरी एक अशीच घटना घडली, जिथे ६५ वर्षीय कुमार याने संशयावरून आपली पत्नी देविका (५५) हिची धारदार शस्त्राने हत्या केली. शबरीमाला यात्रेदरम्यान पत्नी एका ड्रायव्हरशी बोलत असल्याचा संशय त्याला होता. या रागातून त्याने पत्नीचा खून केला आणि स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलांनी हस्तक्षेप केल्याने तो वाचला. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या मानसिक समस्या आणि एकाकीपणामधून घडणाऱ्या या घटनांनी पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.