मुंबई - इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी बॅलार्ड पियर येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात उद्योगपती राज कुंद्रा हे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास हजर झाले आहेत. कुंद्रा यांची ईडी कार्यालयात गेल्या २ तासांपासून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या चौकशीनंतर आता कुंद्रा यांची ईडी चौकशी करत आहे.इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावले होते. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आजच कुंद्रा यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय उघड होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.इकबाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघब्रिंद्रासोबत एक व्यावसायिक करार केला होता. रंजित ब्रिंदा हा इकबाल मिर्चीसाठी काम करतो. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशिलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्या संदर्भातील माहिती हाती लागली आहे. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान, २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं आहे. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी या व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने राज कुंद्रा यांना समन्स जारी केले होते.
इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी : उद्योगपती राज कुंद्रा यांची २ तासांपासून चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 13:38 IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या चौकशीनंतर आता कुंद्रा यांची ईडी चौकशी करत आहे.
इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी : उद्योगपती राज कुंद्रा यांची २ तासांपासून चौकशी सुरु
ठळक मुद्दे कुंद्रा यांची ईडी कार्यालयात गेल्या २ तासांपासून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.