मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत सापडला होता. संघ संकटात असताना पुन्हा एकदा सूर्या भाऊ MI च्या मदतीला धावून आला. स्लो पिचवर आधी संयमी खेळी करत तो सेट झाला अन् मग त्याने आपल्या भात्यातून आणखी एक कडक अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव यंदाच्या हंगामात प्रत्येक सामन्यात चमकला आहे. त्यात महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने आणखी एका दमदार खेळीची भर घातली. सूर्यकुमार यादवनं ३६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्यानंतर अखेरच्या षटकापर्यंत टिकून राहत त्याने तुफान फटकेबाजीचा नजरा पेश करत ४३ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्याच्या भात्यातून आली तिसरी फिफ्टी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवनं झळकावलेले हे तिसरे अर्धशतक आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिली फिफ्टी झळकवताना ४३ चेंडूत ६७ धावांची खेळी केली होती. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याच्या भात्यातून ३० चेंडूत ६८ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या करून संघाला मोठा दिलासा दिला.
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी पोहचला
सूर्यकुमार यादव हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. यंदाच्या हंगामात तो एकाही सामन्यात २५ किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर बाद झालेला नाही. सलग १३ सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा करण्याचा खास रेकॉर्डही त्याने आपल्या नावे नोंदवला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील नाबाद ७३ धावांच्या खेळीसह तो यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. १३ सामन्यात त्याने ७२.८८ च्या सरासरीसह १७०.४७ च्या स्ट्राइक रेटनं ५८३ धावा काढल्या आहेत. या शर्यतीत साई सुदर्शन १२ सामन्यात ६१७ धावासंह पहिल्या तर शुबमन गिल १२ सामन्यातील ६०१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.