मुंबई : पोलिस भरती परीक्षेदरम्यान बनावट ओळखपत्रासह इलेक्ट्रिक डिव्हाईजचा वापर करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध गुन्हे नोंदवत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ओशिवरापाठोपाठ टिळकनगर, व्हीपी रोड, कांदिवली, कस्तुरबा पोलिस ठाण्यात पाच गुन्हे नोंद आहे. त्यामुळे अंगावर वर्दी चढण्याऐवजी उमेदवारांना पोलिस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.
ओशिवरा पोलिसांनी शनिवारी पोलिस भरतीच्या परीक्षेदरम्यान कॉपी करताना एकाला पकडून त्याच्यावर कारवाई केली. रविवारी बोरिवली येथील जयाबेन खोत हायस्कूलमध्ये पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याला पकडले. संभाजीनगरहून आलेल्या रौफ इन्सानखान पठाण (वय २७) याने ब्ल्यूटूथ वापरले. त्याच्या विरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
कांदिवली पोलिसांनी बीडमधील निखिल नागरगोजे (वय २१) याला अटक केली. तो बनावट हॉल तिकीट घेऊन परीक्षेला बसला असताना ही कारवाई करण्यात आली आहे. व्हीपी रोड पोलिसांनी संभाजीनगरहून आलेल्या दिव्या अंभोरे (१९) हिच्यासह एका उमेदवाराविरुद्ध गुन्हा नोंदवत दिव्यावर अटकेची कारवाई केली आहे. तिने देखील बनावट हॉल तिकिटाच्या आधारे परीक्षा दिली. टिळकनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत संभाजीनगरच्या रामेश्वर वाघ (वय २४) याच्याकडे इअर मायक्रोफोन डिव्हाईज आढळले. त्याला अटक करत त्याचे साथीदार समाधान मोरे आणि अर्जुन जारवाल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दुसऱ्या कारवाईत नवी मुंबईचा गणेश विघ्नेविरुद्धही अटकेची कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षी १७७ जणांना अटक पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान गेल्यावर्षी मुंबईसह राज्यभरात ६६ गुन्हे नोंदवत १७७ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये डमी उमेदवार, पायातील चीप बदलणे तसेच इलेक्ट्रिक डिव्हाईजचा वापर करून गैरप्रकार केल्याचे उघड झाले होते.