डॉक्टर कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुरुवातीला ज्या घटनेला नैसर्गिक मृत्यू मानलं जात होते, ती प्रत्यक्षात एक नियोजित हत्या असल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलीस तपासात आरोपी पतीने आपल्या गर्लफ्रेंडला केलेले काही चॅट्स समोर आले असून त्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. सध्या पोलिसांनी आरोपी पती महेंद्र रेड्डी याच्याभोवती फास आवळला आहे.
या प्रकरणाची सुरुवात २३ एप्रिल २०२५ रोजी झाली. कृतिका आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. पती महेंद्र रेड्डी तिला भेटायला गेला. स्वतः डॉक्टर असल्याने महेंद्रने पत्नीवर उपचार करण्यास सुरुवात केली. उपचारांच्या नावाखाली त्याने दोन दिवस कृतिकाला काही इंजेक्शन्स दिली. मात्र, त्यानंतर अचानक कृतिकाची तब्येत खालावली आणि त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
बहिणीच्या संशयामुळे बिंग फुटलं
सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद 'आकस्मिक मृत्यू' म्हणून केली होती. कोणालाही हा खून असावा असा संशय आला नाही. परंतु, कृतिकाची बहीण निखिता एम. रेड्डी यांना या घटनेवर संशय आला. मृत्यूमागे काहीतरी वेगळं कारण असावं असं तिला वाटलं आणि तिने सखोल तपासाची मागणी केली.
फॉरेन्सिक रिपोर्ट आणि धक्कादायक खुलासा
तपासादरम्यान फॉरेन्सिक रिपोर्टने सर्वांनाच हादरवून सोडलं. कृतिकाच्या शरीरातील अवयवांमध्ये 'प्रोपोफोल' (Propofol) नावाच्या एनेस्थेटिक औषधाचे अंश आढळले. हे औषध सहसा ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जातं आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच दिलं जातं. या खुलाशानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
१० लाखांहून अधिक डिजिटल फाइल्सचा तपास
पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. आरोपीचे मोबाईल, एप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून प्रचंड डेटा मिळवला गेला. आतापर्यंत तब्बल १०.३४ लाख डिजिटल फाइल्सची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 'PhonePe' एपवरील ४८५ चॅट रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक टीमने रिकव्हर केलेले अनेक डिलीट केलेले मेसेज समाविष्ट आहेत. या पुराव्यांनी केसचे चित्र पूर्णपणे बदलले.
गर्लफ्रेंडला पाठवलेला तो 'मेसेज' ठरला गेमचेंजर
तपासात महेंद्र रेड्डीने आपल्या गर्लफ्रेंडला पाठवलेला एक मेसेज समोर आला. यात त्याने तिला पोलिसांना काय सांगायचं याचे स्पष्ट निर्देश दिले होते. "मला कॉल किंवा मेसेज करू नकोस आणि पोलिसांनी विचारलं तर आपण फक्त मित्र आहोत असं सांग" असं त्याने मेसेजमध्ये लिहिलं होतं. तसेच कॉल रेकॉर्डबद्दल विचारल्यास केवळ मदतीसाठी संपर्क केला होता, असं सांगायलाही त्याने सुचवलं होतं.
गुन्ह्याची कबुली
आणखी एका मेसेजमध्ये महेंद्रने लिहिलं होतं की, त्याने कृतिकाची हत्या केली आहे आणि आता त्याला जेलमध्ये जावं लागेल हे त्याला माहित आहे. "एक खुनी कधीच सुखी राहू शकत नाही आणि मी आता तसाच जगणार" असंही त्याने मेसेजमध्ये म्हटलं होतं. हा मेसेज या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर
महेंद्र रेड्डीने आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून पत्नीला प्रोपोफोलचा ओव्हरडोज दिला, जेणेकरून तिचा मृत्यू नैसर्गिक वाटेल, असा पोलिसांचा आरोप आहे. २४ मे २०२४ रोजी त्याचं लग्न झालं होतं. लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच हे टोकाचं पाऊल का उचलले गेले, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या न्यायालयाने महेंद्र रेड्डीचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून त्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही.
Web Summary : Dr. Kritika Reddy's death, initially deemed natural, was murder. Husband, Dr. Mahendra Reddy, used injections and his medical knowledge. Digital evidence, including girlfriend chats revealing planned deception, led to his arrest after sister's suspicion and forensic report.
Web Summary : डॉ. कृतिका रेड्डी की मौत, जिसे पहले स्वाभाविक माना गया, हत्या निकली। पति, डॉ. महेंद्र रेड्डी ने इंजेक्शन और अपने चिकित्सा ज्ञान का इस्तेमाल किया। गर्लफ्रेंड के चैट सहित डिजिटल सबूतों से धोखे का पता चला, जिसके बाद बहन के संदेह और फोरेंसिक रिपोर्ट से गिरफ्तारी हुई।