मध्य प्रदेशातील इंदूरहून हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेलेल्या नवविवाहित कपलसोबत धक्कादायक घटना घडली आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनमचा ११ दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर रेस्क्यू टीमला राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला आहे. मात्र पत्नी सोनम अजूनही बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे. आता राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्यामुळे या संपूर्ण घटनेला नवं वळण मिळालं आहे.
हनिमूनसाठी पत्नी सोनमसोबत शिलाँगला गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे उघड झालं आहे. पूर्वी खासी हिल्सचे एसपी विवेक सय्यम यांनी ही माहिती दिली आहे. राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. राजाची ट्री कटरने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच राजाच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
इंदूरचा राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. दोघेही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. त्यानंतर अचानक दोघांचेही फोन बंद झाले. यामुळे इंदूरमधील त्यांचं कुटुंब खूप अस्वस्थ झालं. यानंतर, कुटुंबातील काही सदस्य स्वतः शिलाँगला पोहोचले. मात्र तरी राजा आणि सोनमचा पत्ता लागला नाही. त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली.
पोलिसांनी शिलाँगमध्ये शोध सुरू केला तेव्हा कपलने भाड्याने घेतलेली गाडी आढळली. कुटुंबाला आशा होती की, ते दोघेही सापडतील. मात्र आता ११ दिवसांनी जेव्हा तरुणाचा मृतदेह सापडला तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या हातावर असलेल्या टॅटूवरून ओळख पटवल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस त्याची पत्नी सोनमचा शोध घेत आहेत. या घटनेने सर्वच जण हादरून गेले आहेत.