जयपूर - परदेशात जाऊन नोकरी करून जास्त पैसे कमावण्याचं सर्वांचेच स्वप्न असते. काहींचे ते स्वप्न पूर्ण होते तर काही जण ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. आता नोकरीची ही ऑफर तुमच्या फायद्याचीच असेल असं नाही. एखाद्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकून काहींचे आयुष्यही उद्ध्वस्त होते. अलीकडेच म्यानमारमध्ये शेकडो भारतीयांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली होती. भारत सरकारच्या प्रयत्नांनी तिथल्या स्थानिक पोलिसांनी ओलीस ठेवलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन चालवलं. त्यात पोलिसांनी एकूण ५४० भारतीय युवकांची सुटका केली ज्यात २४ वर्षीय राजस्थानी युवकाचाही समावेश होता. या युवकांपैकी काहींनी त्यांना ओलीस बनवण्याची जी घटना सांगितली ती थरकाप उडवणारी आहे.
राजस्थानातील अनेक युवक आयटी सेक्टरमध्ये काम करण्यासाठी जास्त पैशाची इच्छा ठेवतात. या युवकांना अनेक लोक परदेशात नोकरीचं आणि मोठ्या पॅकेजचं आमिष देऊन जाळ्यात ओढतात. जे युवक आयटीत करिअर बनवू इच्छितात ते लाखो रूपयांचे पॅकेज पाहून अलगद त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. गुजरातच्या एका ठगाने आमिष देऊन राजस्थानातील अनेक युवकांना शिकार बनवले. त्यातील अनेकांसोबत फसवणूक झाली, त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय या युवकांकडे काहीच पर्याय नव्हता. म्यानमारमध्ये अडकलेल्या राजस्थानी युवकाची कहाणी अशीच होती.
या युवकाला मोठ्या पॅकेजची ऑफर देऊन आधी बँकॉकला घेऊन गेले. त्यानंतर रस्ते मार्गाने म्यानमारच्या सीमेपर्यंत आणलं. तिथून नदी पार करून म्यानमारमध्ये प्रवेश करून दिला. म्यानमारला पोहचल्यानंतर सर्व युवकांना ओलीस ठेवले आणि त्यांच्याकडून सायबर गुन्हे घडवून आणले. एका पीडित युवकाने सांगितले की, म्यानमारच्या जंगलात अनेक बड्या बड्या इमारती आहेत. त्या इमारतीत अन्य देशातून आणलेल्या युवकांना ओलीस ठेवले जाते. त्यांना सायबर फसवणूक कशी करायची हे शिकवले जाते. त्यानंतर १ कोटींची फसवणूक केल्यावर १० टक्के कमिशन आणि १० लाख रूपये दिले जायचे. जर ठराविक वेळेत सायबर गुन्ह्याचे टार्गेट पूर्ण केले नाही तर आर्थिक दंडही लावला जायचा. या युवकांचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला जायचा. ओलीस ठेवलेल्या युवकांना त्यांच्या देशातील लोकांना व्हिडिओ कॉल करायला लावायचे. जेव्हा कॉल रिसीव व्हायचा तेव्ह महिला मॉडेलशी बोलायला लावून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत पैसे लाटायचे.
म्यानमारच्या सैनिकांनी केली सुटका
शारीरिक छळानंतर काही युवकांनी त्यांच्या कुटुंबाला कॉल करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर भारतीय दूतावासाने म्यानमार सरकारकडे तक्रार पाठवली. म्यानमार सरकारने तात्काळ दखल घेत रेस्क्यू ऑपरेशन करून अनेक इमारतीतून घुसून कारवाई केली. त्याठिकाणी भारतासह अन्य देशातील शेकडो युवकांना मुक्त केले. सुटका झालेल्या युवकांमध्ये ५४० भारतीय युवक होते. त्यातील राजस्थानातील ३१ युवक होते त्यांना २ दिवसांपूर्वीच राजस्थानात आणले गेले. भारतात आणलेल्या या युवकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून भविष्यात ते सायबर गुन्ह्यात लोकांची फसवणूक करू नये अशी सूचना कुटुंबाला दिली आहे.
दरम्यान, दर महिन्याला ८७ लाखांची फसवणूक करण्याचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर ७५ हजार महिना पगार युवकांना दिला जायचा. त्यात आणखी ७ लाख रूपये इसेंटिव्ह म्हणून आमिष दिले जायचे. जर युवकांनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले नाही तर त्यांना जेवण द्यायचे नाहीत. मारहाण व्हायची, काहींना इलेक्ट्रिक शॉकही दिले आहेत असं राजस्थानच्या जयपूर पोलिसांनी सांगितले. म्यानमारच्या जंगलात उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारतींमध्ये युवकांना कैद ठेवले जायचे. त्याला आयटी पार्क असं नाव दिले होते.