- एसपी सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : व्यापारी, राजकीय नेते, वकील, शिक्षक व सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून एकानंतर एक केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. पोलिसांनी या घटनांसाठी अवैध शस्त्रे व दारूगोळ्याची व्यापक उपलब्धतेला जबाबदार ठरवले आहे.
मागील दहा दिवसांत व्यावसायिक गोपाल खेमका, भाजप नेते सुरेंद्र कुमार, ६० वर्षीय महिला, एक दुकानदार, एक वकील व एका शिक्षकासह अनेक लोकांच्या हत्या झाल्याने निवडणुकीपूर्वी बिहार हादरून गेला आहे.
राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या नवीन आकडेवारीनुसार, राज्यात जानेवारी ते जून दरम्यान दर महिन्याला सरासरी २२९ हत्यांबरोबरच १,३७६ हत्यांची प्रकरणे घडली. २०२४ मध्ये ही संख्या २,७८६ व २०२३ मध्ये २,८६३ एवढी होती. बिहार हिंसक गुन्हे, पिस्तुलीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये देशातील पाच टॉप ५ राज्यांमध्ये सामील आहे.
जमिनीचा वाद व संपत्ती...पोलिस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितले की, बहुतांश हत्यांमागे जमिनीचा वाद आणि संपत्तीची प्रकरणे, हेच मुख्य कारण आहे. अशा प्रकरणांत पोलिसांची भूमिका मर्यादित असते आणि ती गुन्हा झाल्यानंतर सुरू होते. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा संघटित गुन्हेगारी कमी झाली आहे.
बेरोजगारी...अतिरिक्त पोलिस महासंचालक (मुख्यालय) कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे राज्य, ज्याची ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची व बेरोजगार आहे. तेथे कायदा-व्यवस्थेच्या समस्या उभ्या राहणे स्वाभाविक आहे.
बिहार क्राइम कॅपिटल ऑफ इंडिया : राहुल गांधीराहुल गांधी यांनी म्हटले आहे की, बिहार भारताच्या गुन्हेगारीची राजधानी झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आपली खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत व भाजप कोट्यातील मंत्री कमिशन कमावत आहेत. यावेळची विधानसभा निवडणूक सरकार बदलण्याची नव्हे, तर बिहार वाचवण्याची आहे. राज्यात ११ दिवसांत ३१ हत्या झालेल्या आहेत. गुंडाराज बेरोजगार युवकांना मारेकरी बनवत आहे, अशी टीका त्यांनी केली.