सोलापूर - ६ वर्षापूर्वी भावाचा खून केल्याचा राग मनात धरून रविवार पेठ जोशी गल्ली येथे जबर मारहाण करून एकाचा खून करण्यात आला आहे. १० मार्चला रात्री ११.५० वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
उत्तम सरवदे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने तुकाराम उर्फ रॉबर्ट सरवदे याचा खून केला आहे. २०१९ साली उत्तम सरवदे याचा भाऊ सागर सरवदे याचा तुकाराम सरवदे याने खून केला होता. या प्रकरणी तुकारामला अटक झाली होती. ३-४ वर्षानंतर तो जेलमधून बाहेर आला होता. तुकाराम काही दिवस मुंबईत राहिला त्यानंतर सोलापूरात आला, इथं मिळेल ते काम करून उपजीविका भागवत होता. सोमवारी रात्री तुकाराम सरवदे आणि उत्तम सरवदे दोघे एकमेकांच्या समोरासमोर आले तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली.
त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ होऊन हाणामारीला सुरूवात झाली. उत्तम सरवदे याने हाताने आणि लाथाबुक्क्यांनी तुकारामला जबर मारहाण केली. या मारहाणीत तुकाराम सरवदे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले परंतु पहाटे २.१५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णू सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रात्री या दोघांनीही मद्यपान केले होते. तुकाराम हा कट्ट्याजवळ होता, उत्तम तेथून जात असताना ते दोघे एकमेकांच्या समोर आले, या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी सुहास चव्हाण यांनी सांगितले.
पैलवानी डावपेचामध्ये डोक्याला लागला मार?
उत्तम सरवदे याने लाथाबुक्क्यांनी तुकाराम सरवदे याला मारहाण केली. त्यात कोणतेही शस्त्र वापरले नाही. पैलवानी डावपेचात उचलून आपटल्यामुळे तुकारामच्या डोक्याला जबर मार बसला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.