भूवनेश्वर - ओडिशाची राजधानी भूवनेश्वर येथे अजब गजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून प्रियकराच्या अपहरणाचा कट रचण्यात आला. अपहरणानंतर प्रियकराच्या कुटुंबाकडून १० लाखांची खंडणी मागितली. हे प्रकरण पोलिसांकडे पोहचताच तात्काळ पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर ६ तासांतच अपहरण नाट्य उघड करत आरोपींना अटक केली आणि पीडित युवकाला सुरक्षितपणे घरच्यांकडे सोपवले.
झारखंडच्या जमशेदपूर येथील दीप्ती ३ वर्षापासून भूवनेश्वर येथे राहत होती. सोमनाथ जगतसिंहपूर जिल्ह्यात राहत होता. त्याचे कुटुंब जमशेदपूर येथे आहे. सोमनाथ आणि दीप्ती हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्याकडे ना नोकरी होती, ना कुठले उत्पन्नाचे साधन होते. रविवारी रात्री सोमनाथने दीप्तीवर दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याचा आरोप केला. ज्यातून दोघांमध्ये वाद झाला. सोमनाथने दीप्तीला मारहाण केली. याच मारहाणीचा बदला घेण्याचा प्लॅन दीप्तीनं आखला.
दीप्तीने तिचा मित्र आकाशला संपर्क केला. सोमवारी संध्याकाळी आकाश त्याचा सहकारी राकेश, श्यामसुंदर, सिबाराम यांच्यासह सोमनाथच्या घरी पोहचले. या सर्वांनी मिळून सोमनाथला बेदम मारत त्याला रात्री बळजबरीने त्यांच्या वाहनातून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी आरोपींनी सोमनाथच्या मोबाईलवरून त्याची बहीण अंजिता नायक हिला संपर्क केला. सोमनाथचं अपहरण केले असून तो सुखरूप हवा असेल तर १० लाख रूपये आणून दे अशी धमकी दिली.
प्रकरण पोलिसांकडे पोहचले...
धमकीचा फोन आल्यानंतर अंजिता जमशेदपूरहून भूवनेश्वरला पोहचली आणि तिथे खारवेला नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डीसीपी जगमोहन मीणा म्हणाले की, जेव्हा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार आली तेव्हा तातडीने तपासासाठी ३ पथके नेमण्यात आली. सोमनाथचा मोबाईल ट्रेस करून शहरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्यानंतर सोमनाथचं ठिकाण कळल्यानंतर पोलिसांनी त्याला एका हॉटेलमधून रेस्क्यू केले. अपहरणकर्त्यांकडून या गुन्ह्यात दीप्तीचे नाव पुढे आले. तिनेच हा सगळा कट रचला होता. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.