उत्तर प्रदेशातील कानपूर येथे खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी एक युवक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, परंतु त्याचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू होते. गर्लफ्रेंडला याची भनक लागताच या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्या रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. जिच्यासोबत तो लिव्ह इनमध्ये राहत होता.
हत्येनंतर आरोपीने मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून १०० किमी दूर यमुना नदीत फेकून दिला. पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक केली. अद्याप मृत मुलीचा मृतदेह सापडला नाही. कानपूर येथील विजयश्री येथील २० वर्षीय आकांक्षा एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरून तिची ओळख सूरज नावाच्या मुलासोबत झाली. हळूहळू या दोघांमधील जवळीक वाढली, ३ महिन्यांपूर्वी आकांक्षाने आधीच्या रेस्टॉरंटमधील काम सोडून सूरजसोबत दुसऱ्या हॉटेलला ज्वाईन झाली. त्यानंतर या दोघांनी भाड्याने खोली घेऊन लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
सूरजचं एकाच वेळी दोघींसोबत अफेअर
२१ जुलैला आकांक्षाला सूरजचे अन्य एका युवतीसोबत संबंध असल्याचं कळले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. रात्री जवळपास १.३० वाजता जेव्हा ते घरी परतले तेव्हा दोघांमधील वादाने टोक गाठले. याच भांडणात सूरजने गळा दाबून आकांक्षाची हत्या केली. त्यानंतर मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून यमुना नदीत फेकून दिला. या हत्येनंतर सूरज सातत्याने आकांक्षाच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबाला मेसेज पाठवून त्यांची दिशाभूल करत होता. कधीतरी पकडले जाऊ या भीतीने सूरजने तिचा मोबाईल ट्रेनमध्ये सोडून दिला. मात्र अनेक दिवस मुलीशी संपर्क न झाल्याने कुटुंबाने सूरजला कॉल केला. त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कुटुंब पोलिसांकडे पोहचले. सुरुवातीला काही ठोस सुगावा हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली.
त्यानंतर तपासात मोबाईल डिटेल्स, लोकेशन तपासले असता सूरज आणि आकांक्षा यांच्या मोबाईलचे लोकेशन ३ दिवस एकाच ठिकाणी असल्याचं कळले. या दोघांमध्ये बऱ्याचदा फोनवरून संवादही झाला होता. त्याचआधारे पोलिसांनी सूरजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर खाकीचा धाक दाखवाच सूरजने सगळे सत्य सांगून टाकले. या घटनेत पोलिसांनी आरोपी सूरज आणि त्याचा मित्र आशिष यांना अटक करून जेलमध्ये पाठवले. पोलीस सध्या मृत मुलीचा मृतदेह शोधण्याचं काम करत आहेत.